पाणीटंचाईचे खापर पनवेल महापालिकेवर ;२८ एमएलडी पाण्याची गरज पण होतोय १८ एमएलडी पाणीपुरवठा

पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतींना आवश्यकतेपेक्षा कमी पाणी मिळत असल्याने लाखो नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पूर्वीचे नगरपरिषद क्षेत्र वगळता महापालिका हद्दीतील इतर भागांत वेगवेगळ्या यंत्रणांकडून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाणीटंचाईचे खापर नागरिकांकडून महापालिकेवर फोडले जात असल्याने सध्या या प्रश्नाची झळ महापालिका प्रशासनालाही सहन करावी लागत आहे.

१८ एमएलडी पाणीपुरवठा

नवीन पनवेल, कळंबोली, खांदा कॉलनी, रोडपाली आदी सिडको क्षेत्रांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जातो. या सिडको नोडमध्ये संपूर्ण पावसाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. कळंबोली शहराला २८ एमएलडी पाण्याची गरज असताना केवळ १८ एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

तीन महिन्यांपासून ही परिस्थिती कायम

नवीन पनवेलमध्ये माजी नगरसेवक संदीप पाटील यांनी पाण्यासाठी मोर्चाचा इशारा दिला आहे. रोडपालीतील सामाजिक संघटनांनीही एमजेपी, सिडको आणि पनवेल महापालिकेला जाब विचारला आहे. एमजेपीकडून ठोस कारण न देता आवश्यकतेपेक्षा कमी पाणी दिले जात असल्याने टंचाई जाणवत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मागील तीन महिन्यांपासून ही परिस्थिती कायम आहे.

पाण्याचे नियोजन करून पाणीपुरवठा

पाणीटंचाईच्या काळात नागरिकांनाटँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी सिडकोची आहे. मात्र, सिडकोकडून टँकर नियमितपणे पाठवले जात नसल्याने अनेक रहिवासी सोसायट्यांना खासगी टँकर मागवून पाण्याची गरज भागवावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांवर आर्थिक भारही पडत आहे. पनवेल शहरात देहरंग धरणातील पाण्याचे नियोजन करून पाणीपुरवठा केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *