अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव करण्यात आला. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीसह पाच जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. अप्पासाहेब लक्ष्मण चव्हाण (वय ५२, रा. डफळापूर, ता. जत) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना दीड महिन्यानंतर उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी सुनीता अप्पासाहेब चव्हाण (वय ४०), गंगाधर रामू तेली (वय ५०), विक्रांत सर्जेराव चव्हाण (२३), प्रतीक लक्ष्मण मोकाशी (दोघेही रा. कोकळे, ता. कवठेमहांकाळ) आणि मृताच्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संशयित सुनीता चव्हाण हिचे गंगाधर तेली याच्यासोबत गेल्या १८ वर्षांपासून अनैतिक प्रेमसंबंध होते. याची माहिती आप्पासो यांना झाल्यानंतर ते पत्नीवर संशय घेऊन वारंवार वाद घालत होते. या कारणावरून गंगाधर तेली व सुनीता यांनी आप्पासो यांचा खून करण्याचा कट रचला. गंगाधरने त्याचा मित्र विक्रांत चव्हाण याला एक लाख रुपये देण्याचे ठरवून प्रतीक मोकाशी यालाही या कटात सहभागी करून घेतले. २२ ऑगस्टच्या रात्री आप्पासो यांना पत्नी सुनीताने जेवणातून गुंगीच्या गोळ्या औषध दिले. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास तिने घराचा दरवाजा उघडून गंगाधर, विक्रांत व प्रतिक यांना आत घेतले. यावेळी ऐश्चयनि घराबाहेरील कुत्र्याला पकडून ठेवले. घरात आल्यानंतर विक्रांतने आप्पासो यांचे हात, तर प्रतिकने पाय पकडले. त्यानंतर गंगाधरने उशीने तोंड दाबून व हाताने गळा आवळून त्यांचा खून केला.
