बारामतीत भावकीतील २५ वर्षीय तरुणाने दोन महिलांना संपवलं; पोलिसांच्या तपासात फुटलं बिंग, धक्कादायक कारण उघड

बारामती तालुक्यातील सुपा येथील शेरेवाडीमध्ये घराबाहेर झोपलेल्या दोन वृद्ध महिलांची सोन्याच्या दागिन्यांसाठी हत्या केल्याप्रकरणी विकास उर्फ अप्पा राजेंद्र लडकत (वय २५, रा. शेरेवाडी, ता. बारामती) याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. आरोपीने दोन्ही महिलांचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत महिलांच्या अंगावरील सुमारे सहा लाख रुपये किमतीचे पाच तोळे सोन्याचे दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहेत.

या प्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात २९ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश मारुती लडकत (वय ४५, व्यवसाय नोकरी, मूळ रा. शेरेवाडी, सध्या रा. तांदुळवाडी रोड, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची आई इंदुमती मारुती लडकत (वय ७५) आणि चुलत वहिनी कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय ५५) या दोघी घरासमोरील ओट्यावर झोपल्या होत्या. त्या वेळी अज्ञात चोरट्यांनी घरात जबरदस्तीने प्रवेश करून कपाटातील सामान उचकले होते. त्यानंतर दोघींच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेत त्यांच्या मानेवर व गळ्यावर धारदार हत्याराने गंभीर वार करून त्यांचा खून केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा आणि पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेसह सुपा, दौंड, बारामती शहर आणि बारामती तालुका पोलिस ठाण्यांची आठ पथके तयार करण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरासह पंचक्रोशीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या संशयितांचा शोध घेण्यासाठी अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, बीड, कोल्हापूर तसेच निपाणी (कर्नाटक) येथे पथके पाठविण्यात आली. या पथकांनी दोनशेहून अधिक रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी केली. त्याचबरोबर स्थानिक भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगार, शेरेवाडीतील नागरिक तसेच फिर्यादीच्या घराच्या परिसरातील व्यक्तींवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. तपासादरम्यान शेरेवाडीतील विकास लडकत याच्या हालचाली संशयास्पद आढळल्या.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे आढळले. अधिक चौकशी करून विश्वासात घेतल्यानंतर त्याने सोन्याच्या दागिन्यांसाठी भावकीतील दोन्ही महिलांचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून चोरीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुपा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *