डॉ. मनीषा जेजूरकर यांना जीव देण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक झालेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार विभागाच्या प्रमुख संशयित डॉ. स्वाती नकुल वंजारी उर्फ स्वाती शंकर चव्हाण हिला नाशिक जिल्हा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. पन्नास हजार रुपयेच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रक्कमेच्या एक किंवा अधिक जामीनदारांच्या हमीवर जामिनावर नाशिकरोड कारागृहातून सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
नीलेश जेजूरकर-स्वाती चव्हाणला अटक
डॉ. मनीषा जेजूरकर यांना आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी १८ सप्टेंबर रोजी त्यांचा पती जिल्हा शासकीय रुग्णालयाचा (सिव्हिल) मानसोपचार तज्ज्ञ संशयित डॉ. नीलेश जेजूरकर याला अटक झाली. तर, वीस सप्टेंबर रोजी डॉ. स्वाती चव्हाण हिला देखील अटक करण्यात आली. २१ सप्टेंबरपासून दोघेही नाशिकरोड कारागृहात असून डॉ. स्वाती हिने २९ सप्टेंबर रोजी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्यामार्फत ज्येष्ठ वकील अविनाश भिडे व वकील मृणाल भिडे यांनी युक्तिवाद केला.
मृत्यू प्रकरणाचे सहा महिने
गंगापूर रोडवरील रेवती ब्ल्यू अपार्टमेंटमध्ये ६ मार्च २०२६ रोजी डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आपल्या आयुष्याची अखेर केली होती. बहीण रोहिणी थोरात यांच्या फिर्यादीवरून मनीषा यांचे पती डॉ. नीलेशविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. ‘डॉ. स्वाती चव्हाण जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार विभाग प्रमुख होती. डॉ. नीलेशने तिच्यासोबत जवळीक साधून घरातील सर्व गोष्टी तिला सांगितल्या. मग स्वातीच्या मनाप्रमाणे वागत डॉ. मनीषाकडे दुर्लक्ष करुन मानसिक त्रास दिला आणि जीव देण्यास प्रवृत्त केले.’ असा आरोप रोहिणी थोरात यांनी केला होता.
