नवी मुंबईहून परदेशी प्रवासाला नागरिक वैतागले; अतिरिक्त वेळ आणि खर्च ठरतोय त्रासाचे कारण

मुंबईहून उड्डाण करणारी आंतरराष्ट्रीय विमाने नवी मुंबई विमानतळाकडे वळवण्यासाठी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडकडून प्रयत्न सुरू असले, तरी विमान कंपन्यांसह प्रवाशांमध्येही या पर्यायाबाबत फारसा उत्साह नसल्याचे चित्र आहे. तिकीटदरांतील फरक, विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा अतिरिक्त खर्च, प्रवासाचा वेळ आणि सामानासह होणारी गैरसोय यामुळे नवी मुंबईहून विमानप्रवास मुंबईकरांसाठी महाग आणि त्रासदायक ठरत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली नाराजी

मुंबईहून सुटणारी काही देशांतर्गत विमाने नवी मुंबईकडे वळवल्यानंतर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केल्याचे पर्यटन व्यावसायिकांनी निदर्शनास आणले आहे. विशेषतः उत्तर मुंबई, पश्चिम उपनगरे आणि दक्षिण मुंबईतून प्रवास करणाऱ्यांसाठी नवी मुंबई विमानतळ तुलनेने लांब पडतो. विमानतिकीट हा खर्चाचा एक भाग असला, तरी विमानतळापर्यंत पोहोचणे किती सोयीचे आहे, किती सामान आहे, मोठ्या बॅगा नेण्यासाठी नेण्यासाठी सुविधा आणि त्यासाठी किती वेळ खर्च होणार आहे, हे घटकही प्रवाशांसाठी महत्त्वाचे ठरतात.

अतिरिक्त वेळ

‘मुंबईतील विविध भागांतून नवी मुंबई विमानतळापर्यंत जाण्याचा एकेरी खर्च साधारण ९०० ते १,८०० रुपयांपर्यंत येतो. परदेश प्रवासासाठी किंवा मोठ्या बॅगा असल्यास मोठी गाडी घ्यावी लागते. अशा वेळी हा खर्च दोन ते अडीच हजार रुपयांहून अधिक जाऊ शकतो.

उत्तर मुंबईतून नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही दोन तासांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे अतिरिक्त वेळ आणि अतिरिक्त खर्च या दोन्ही कारणांमुळे हा पर्याय परवडणारा नाही,’ अशी प्रतिक्रिया पश्चिम उपनगरातील रहिवासी संकेत यांनी व्यक्त केली. ते कामानिमित्त विविध शहरांना वारंवार प्रवास करतात.

विमान गाठण्यासाठी दोन तास आधी प्रवास

‘विमानप्रवास ही आता चैन राहिलेली नसून वेळ वाचवण्याचे महत्त्वाचे साधन ठरली आहे. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा प्रवास करणाऱ्या कॉर्पोरेट प्रवाशांना आधी दोन तास रस्त्याने प्रवास करून विमानतळ गाठणे परवडणारे नाही,’ असे कॉर्पोरेट कर्मचारी विराज यांनी सांगितले. ‘मुंबईसारख्या शहरात नियमित विमानप्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीचा विचार न करता नवी मुंबई विमानतळावरून प्रवासाचा आग्रह धरणे योग्य ठरणार नाही,’ असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *