ठाणे शहराच्या खाडीकिनारी असलेल्या कांदळवन आणि संवेदनशील जलपरिसंस्थेच्या संरक्षणासाठी वन विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. चुहा ब्रिज परिसर आणि खर्डीगाव ब्रिजजवळील कांदळवन क्षेत्राच्या संरक्षणासाठी पायलिंग करून बॅरिकेड्स उभारण्यात येणार आहेत. या कामांसाठी वन विभागाकडून सुमारे ४ कोटी ५७ लाख ९५ हजार ३४८ रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. याबाबत निविदा काढण्यात आल्या असून, सहा महिन्यांच्या मुदतीत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
भरती-ओहोटीच्या क्षेत्रात ६०० मिमी व्यासाचे पाइल
ठाणे खाडीकिनाऱ्यावरील कांदळवन क्षेत्र पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील आहे. मात्र या भागात सातत्याने मानवी हस्तक्षेप आणि अतिक्रमणाचा धोका निर्माण होत असल्याने परिसराच्या संरक्षणासाठी काँक्रीट पायलिंगवर आधारित बॅरिकेड्स उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. केवळ साध्या कुंपणाऐवजी भरती-ओहोटीच्या क्षेत्रात ६०० मिमी व्यासाचे पाइल उभारून हे संरक्षणात्मक काम केले जाणार आहे.
चुहा ब्रिज परिसरात दोन कामे हाती घेण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या कांदळवन विभागाकडून या कामांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. चुहा ब्रिज परिसरात दोन कामे हाती घेण्यात आली असून, त्यापैकी एका कामासाठी १ कोटी ८५ लाख ३१ हजार ८४४ रुपये, तर दुसऱ्या कामासाठी १ कोटी ३७ लाख ४६ हजार ३०९ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. खर्डीगाव ब्रिज परिसरातही याच धर्तीवर बॅरिकेड्स उभारण्यात येणार असून, त्यासाठी १ कोटी ३५ लाख १७ हजार १९५ रुपये खर्च होणार आहेत.
पर्यावरणीय हानी टाळण्याच्या अटी
ठाणे खाडीकिनाऱ्यावरील पाणथळ क्षेत्र आणि खारफुटीच्या संरक्षणासाठी ही कामे केली जाणार असल्याने कामादरम्यान पर्यावरणाचे नुकसान होऊ नये, यासाठी वन विभागाने कंत्राटदारावर कठोर अटी घातल्या आहेत. काम करताना कांदळवन, चिखलपट्टी, खाडीकिनारे, जलचर अधिवास आणि आसपासच्या नैसर्गिक परिसंस्थेला कोणतीही हानी पोहोचू नये, याची खबरदारी घेणे आवश्यक असणार आहे.
दंडात्मक , कायदेशीर कारवाई
कांदळवनाची अनधिकृत तोड, छाटणी किंवा नुकसान करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच सिमेंटची मळी, ड्रिलिंगमधून निघालेला गाळ, खोदकामातील सामग्री, इंधन, तेल, रसायने, प्लास्टिक किंवा बांधकाम कचरा खाडी अथवा परिसरात सोडता येणार नाही. कंत्राटदाराच्या कामामुळे प्रदूषण किंवा पर्यावरणीय नुकसान झाल्यास ते स्वतःच्या खर्चाने दूर करावे लागणार असून, संबंधित दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागेल.
खाडीच्या पाण्यात पायलिंग
या कामांत खाडीच्या पाण्यात पायलिंग करावे लागणार असल्याने तांत्रिकदृष्ट्यासक्षम कंत्राटदाराचा शोध सुरू आहे. चुहा ब्रिज परिसरातील मोठ्या कामासाठी कंत्राटदाराने मागील पाच वर्षांत कोणत्याही भरती क्षेत्रात ६०० मिमी व्यासाचे पाइलचे काम केलेले असणे आवश्यक आहे. तसेच एका वर्षात किमान ९९ रनिंग मीटर एम-४० किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाच्या काँक्रीटचे बोअर्ड पाइल, ११ मेट्रिक टन स्ट्रक्चरल स्टील आणि १६ मेट्रिक टन सहा मिमी जाडीचे एमएस लाइनर वापरलेल्या कामाचा अनुभव असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
भरती-ओहोटीचा अभ्यास आवश्यक
चुहा ब्रिज परिसरातील कामाचे ठिकाण क्षारयुक्त आणि दलदलीचे असून, या भागात वार्षिक पर्जन्यमान २,५०० ते ३,५०० मिमी आहे. कामाच्या ठिकाणी ठाणे-कल्याण महामार्गामार्फत पोहोचता येते. मात्र दैनंदिन भरती-ओहोटीतील बदल, कामाच्या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग आणि भरतीचा अभ्यास करूनच कामाचे नियोजन करावे लागणार आहे. कामाचे ठिकाण खाडी आणि कांदळवनाशी संबंधित असल्याने सीआरझेडसह इतर संबंधित प्राधिकरणांच्या आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतरच कार्यादेश देण्यात येणार आहे.
