रात्री जेवून मुले झोपण्याच्या तयारीत असताना घरातील १७ वर्षांची मुलगी टीव्ही पाहत होती. अचानक लहान भावाने टीव्ही बंद केला. या क्षुल्लक कारणावरून घरात वादाची ठिणगी पडली. भावाला मारहाण केल्यानंतर मुलीची वडिलांशीही झटापट झाली. या झटापटीत वडिलांच्या हातातील बॅटचा फटका थेट तिच्या डोक्यात बसला आणि ती मृत्यूमुखी पडली.
सातारा शहरातील एका कॉलनीतील शिक्षक दाम्पत्य आपल्या तीन मुलांसह राहत होते. त्यांना १७ वर्षांची मुलगी, सहा वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी अशी तीन अपत्ये आहेत. रविवारी रात्री अकराच्या सुमारास दोन्ही लहान मुले जेवून झोपायला गेली. मात्र, १७ वर्षीय मुलगी टीव्ही पाहत बसली होती. रात्री तिच्या लहान भावाने टीव्ही बंद केल्याचा राग आल्याने मुलीने भावाला मारहाण केली. वाद चिघळल्याने मुलगी वडिलांवर चाकू घेऊन धावल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. यानंतर ती बॅट घेऊन वडिलांच्या दिशेने धावली.
वडिलांनी तिच्या हातातली बॅट घेऊन तिच्या डोक्यात फटका मारला. शेजाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे, डीबी पथकातील मोरे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांनीही पथक पाठविले. मृत मुलगी उच्च रक्तदाबासाठी उपचार घेत होती. ती अकरावीत शिकत होती. तिच्या पार्थिवावर रात्री उशिरा मूळ गावी अंत्यसंस्कार झाले.
घटनेच्या रात्री मुलगी टीव्ही पाहत असतानाच मित्रांशी ‘स्नॅपचॅट’वर सक्रिय होती, अशी परिसरात चर्चा होती. याबाबतही पोलिस तपास करीत आहेत. काही महिन्यांपूर्वी तिचे वडिलांशी भांडण झाले होते आणि त्या वेळी त्यांच्या हाताला दुखापत झाल्याची माहितीही चर्चेत आहे. मात्र, या सर्व बाबींची अधिकृत खातरजमा तपासातूनच होणार आहे.
