चार दिवसांपूर्वी घरातून निघून गेलेल्या वाहतूक पोलिसानं रायगड जिल्ह्यातील पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल शुक्रवारी उघडकीस आली. संतोष रामचंद्र ननावरे (वय 36), असं आत्महत्या केलेल्या पोलिसाचं नाव आहे. ते वाई तालुक्यातील ओझर्डे गावचे रहिवासी होते. या घटनेमुळे सातारा जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. पत्नी नांदायला येत नसल्याच्या नैराश्यातून पोलिसानं टोकाचं पाऊल उचलल्याचं स्पष्ट झालं आहे.
रूमचा दरवाजा ठोठावून हाका मारल्या
संतोष ननावरे हे चार दिवसांपूर्वी घरातून निघून गेले होते. मात्र, ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल नव्हती. बेपत्ता काळात ते मुंबई-गोवा महामार्गावरील काळकाई हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या जोगळे लॉजमध्ये मुक्कामी होते. काल शुक्रवारी सकाळी लॉजमधील कर्मचारी ननावरे यांना आंघोळीसाठी पाणी द्यायला लॉज कर्मचारी त्यांच्या खोलीकडे गेला. त्याने रूमचा दरवाजा ठोठावून हाका मारल्या. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे खिडकीची काच सरकवून आत डोकावले असता संतोष ननावरे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.
दरवाजा तोडून मृतदेह खाली उतरविला
या घटनेची लॉज कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलादपूर पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार हे घटनास्थळी दाखल झाले. पोलादपूर पोलिसांनी ननावरे यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देऊन बोलावून घेतलं. नातेवाईक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर खोलीचा दरवाजा तोडून मृतदेह खाली उतरविण्यात आला. पोलिसानेच आत्महत्या केली असल्यानं महाडचे डीवायएसपी प्रदीप काळे, पोलादपूरचे सहायक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांनी घटनास्थळी भेट दिली.
सुसाईड नोटमध्ये कौटुंबिक कलहाचा उल्लेख
पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये कौटुंबिक कलहाचा उल्लेख असल्याची माहिती या घटनेचा तपास करणारे उपनिरीक्षक सतीश पवार यांनी दिली. दरम्यान, पत्नी नांदायला येत नसल्यानं सतत वाद होत होता. त्याच नैराश्यातून संतोष ननावरे यांनी टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सुसाईड नोटवरून स्पष्ट झालं आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेऊन नातेवाईकांनी तो वाई तालुक्यातील ओझर्डे या मूळ गावी आणला. रात्री उशिरा मृतदेहावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची पोलादपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून उपनिरीक्षक सतीश पवार अधिक तपास करत आहेत.
आत्महत्येला पत्नी, तिची बहीण व सासू जबाबदार
दरम्यान, आत्महत्या केलेल्या संतोष ननावरे यांनी लिहलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. आत्महत्येला पत्नी, तिची बहीण व सासू जबाबदार असल्याचे त्यात म्हटले आहे. पत्नीच्या आईच्या सांगण्यावरूनच पत्नी वाद घालत असे, तसेच त्यांना वारंवार पैसा पाहिजे होता व घरात राहायचे नव्हते, असे संतोष यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
