दादर – माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार महेश सावंत यांनाच कॉक्रोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांच्या आंदोलन स्थळी मंचावर येण्यापासून अडवण्यात आल्याची घटना पाहायला मिळाली. मात्र घडलेला प्रकार लक्षात येताच दिलगिरी व्यक्त करण्यात आली.
नेमकं काय घडलं?
त्याचं झालं असं की शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दादर येथील शिवाजी पार्कवर कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने जेल भरो आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सीजेपीच्या या आंदोलनाला मोठी गर्दी जमा झालेली होती. विशेषतः तरुणाईचा (जेन-झी) या आंदोलनाला मोठा पाठिंबा पहायला मिळाला.
विशाल ददलानी, शबाना आझमी मंचावर
सुरुवातीला सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके मंचावर येताच तरुणवर्गात एकच जल्लोष पहायला मिळाला. सर्वप्रथम अभिजीत दिपके यांनी घोषणा करत प्रख्यात संगीतकार विशाल ददलानी यांचं मंचावर स्वागत केलं. या दरम्यान विशाल ददलानी यांनी काही गाणी पण सादर केली.. त्यांचं छोटेखानी भाषण पण झालं. यादरम्यान गर्दीतून वाट काढत आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचं पण मंचावर आगमन झालं. त्यांनीही या आंदोलना संदर्भात भाषण केलं.
कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामार्फत समर्थन जाहीर करण्यात आलेलं होतं. त्या संदर्भातली घोषणा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केलेली होती. आंदोलनाचे ठिकाण होतं द्वार क्रमांक ६, छत्रपती शिवाजी महाराज पार्क. मात्र दादर – माहीम विधानसभा मतदारसंघाचे स्थानिक आमदार महेश सावंत यांनाच दीपके यांच्या आंदोलन स्थळी मंचावर येण्यापासून अडवण्यात आल्याची घटना पाहायला मिळाली.
