ठाण्यामधील मानपाडा येथील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांच्या हत्या प्रकरणामध्ये पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेच्या एसआयटीने शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता या प्रकरणामध्ये पूर्णेकरांवर गोळ्या झाडणाऱ्या शूटरला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचं नाव निखिल यादव असं आहे. याचबरोबर पोलिसांनी पूर्णेकरांवर कोयत्याने हल्ला करणारा आरोपी नितेश पवारलाही ताब्यात घेतलं असून दोघांना 8 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे निखिल यादव हा वडापावच्या गाडीवर काम करायचा आणि तिथूनच त्याने प्रदीप पूर्णेकरांच्या कार्यालयाची रेकी केल्याची माहिती समोर आली आहे.
निखिल आणि नितेश हे दोन्ही आरोपी गोव्याला पळण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांना मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा भागातून अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली. बुधवारी मीरा रोड भागातून ताब्यात घेतलेल्या दोन महिलांच्या चौकशीतूनच निखिल आणि नितेशची माहिती समोर आली. दोघेही कर्नाळा येथील एका दूध डेअरीमध्ये आश्रयाला होते. तेथील डेअरी चालक नितेशच्या मैत्रिणीच्या संपर्कात होता. दरम्यान, या प्रकरणातील तपासात दोन्ही आरोपींची भूमिका तपासून पाहण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. हत्येसाठी या दोघांना शस्त्रे, वाहन आणि इतर साहित्याची व्यवस्था कोणी आणि कशी केली? कटात कुणाचा सहभाग आहे, याचा तपास केला जात आहे.
वडापावच्या गाडीवर करायचा काम
निखिल हा पूर्णेकर राहत असलेल्या मनोरमानगरमध्येच काम करायचा. निखिल येथील एका वडापावच्या गाडीवरच कामाला होता. तो पूर्णेकरांवर पाळत ठेवून होता. त्यानेच पूर्णेकर यांच्यावर गोळीबार केला. नितेशने कोयत्याने वार केला. व्यसनी निखिलला शस्त्रे कोणी दिली. ते चालविण्याचे प्रशिक्षण त्याने कोणाकडून घेतले, याचा शोध घेतला जात आहे. अटक केलेल्या तिन्ही आरोपींकडून शस्त्रे मिळालेली नाहीत.
या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हान
हत्या करण्यापूर्वी ते कुठे गेले 3 होते? या हत्या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे? उर्वरित फरारी आरोपी कुठे आहेत? या हत्येची योजना कुठे आखली ? त्यासाठी मदत आणि रसद कोणी पुरविली? हत्या कोणत्या उद्देशाने केली? या सर्व बाबींची तपासणी करायची असल्याचं पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रियंका पाटील यांच्यासमोर मांडत आरोपींची पोलिस कोठडी मागितली. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवे यांनी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. पप्या शिंदेने हत्येचे मूळ कारण निखिल आणि नितेश यांना माहिती असल्याचे सांगितले. त्यामुळे तिघांचीही एकत्रित चौकशी करायची असल्याचेही पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
