गेल्या सहा ते सात वर्षांत शेकडो चिता मी रचल्या, शेकडो मृतदेह चितेवर ठेवले. तरुण मुले, आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक अशा अनेक लोकांचे अंत्यसंस्कार मी केले. मात्र, आज शरीर साथ देत नव्हते. कधी नव्हे ते डोळ्यातून पाणी आले. चार कोवळ्या मुलांच्या चिता मी रचल्या. त्यांची आई हंबरडा फोडत होती आणि मी त्याच्या मुलाची चिता रचत होतो. यापेक्षा वाईट काम काय असू शकते,’ भरलेल्या डोळ्यांनी स्मशानभूमीत काम करणारे अर्जुन खिल्लारी आपली भावना व्यक्त करीत होते.
अर्जुन खिल्लारी हे आळंदी नगर परिषदेचे कर्मचारी असून आळंदी स्मशानभूमीची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मृतदेह वैकुंठ रथात ठेवणे, त्याला स्मशानभूमीत घेऊन येणे, चिता रचणे, मृतदेह चितेवर ठेवणे, नातेवाइक नसतील, तर स्वतः अग्निडाग देणे अशी काम खिल्लारी करतात. गेली सहा ते सात वर्षे ते ही जबाबदारी सांभाळत आहे. या कालावधीत त्यांनी शेकडो मृतदेहांसाठी चिता रचल्या. वेळप्रसंगी काही वेळा चितेला अग्निडागही दिला. मात्र, आजची परिस्थिती वेगळी होती.
‘ऐन १५-१६ वर्षांची चार मुले मृत्युमुखी पडली होती. सर्वांचे मृतदेह माझ्यासमोर होते. प्रत्येकाची आई, वडील, नातेवाइक मोठमोठ्याने टाहो फोडत होते. ‘आमच्या मुलाला परत द्या… त्याला त्रास होईल हो… तो आमच्या काळजाचा तुकडा आहे…’ अशी हाक आई मारत होती. मी मात्र नाइलाजास्तव एका आईसमोर तिच्याच मुलाची चिता रचत होतो. कधी नव्हे ते माझे अंग जड पडले होते.
