दिवेआगर येथे समुद्रात बुडालेल्या मुलांच्या मृतदेहांवर आळंदीतील स्मशानभूमीत शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकत्र लहानाचे मोठे झालेल्या; तसेच शाळेत, महाविद्यालयात एकत्रच जाणाऱ्या जिवलग मित्रांची चिताही एकाच वेळी पेटविण्यात आली. तन्मय दत्तात्रय वहिले, कैवल्य सतीश वासनकर, प्रणव रामदास बनसोडे, सुमीत तुकाराम आहिरे या चौघांच्या पार्थिवावर आळंदी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
चार जिवलग मित्रांची एकाच वेळी चिता पेटली
विनर्स क्लासेसमध्ये शिकणारे सर्वच विद्यार्थी एकमेकांचे मित्र होते. तन्मय, सुमीत, कैवल्य आणि प्रणव हे आळंदीतच राहत असल्याने एकमेकांचे जिवलग मित्र होते. ट्रिपला जाण्यासाठी या सर्वांनी एकमेकांच्या घरच्यांचा फोन करून परवानगी मिळविली होती. एक दिवसाची सहल आहे, आम्ही एकमेकांची काळजी घेतो, असे सांगून सर्व सहलीला गेले होते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच असल्याने या चारही जिवलग मित्रांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.
तन्मय, सुमीत, कैवल्य आणि प्रणव यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी आळंदी येथे आणण्यात आले. काही वेळ घरी ठेवून लगेच त्यांना अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नेण्यात आले. स्मशानभूमीत सर्वांच्या चिता रचत असताना या विद्यार्थ्यांच्या माऊलींनी एकच हंबरडा फोडला. ‘देवा आमच्यावर हा अन्याय का केलास, आम्हाला हा दिवस का दाखवलास, तळहाताच्या फोडाप्रमाणे आम्ही मुलांना जपलं होतं, कधी काही कमी पडू दिलं नव्हतं, तेच आमच्या म्हातारपणाची काठी होते’ असे म्हणत प्रत्येक विद्यार्थ्याच्या आईने हंबरडा फोडला.
केळगाव येथे स्मशानशांतता
सोहम तुकाराम भांडवलकर आणि राजवीर युवराज वहिले हे आळंदीजवळील केळगाव येथील रहिवासी होते. ते दोघेही जिवलग मित्र होते. दिवेआगर येथे झालेल्या दुर्घटनेत या दोघांचाही बुडून मृत्यू झाला. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी केळगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी गावात अतिशय शोकपूर्ण वातावरण होते. दोन्ही विद्याथ्यर्थ्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक मोठ्या धक्क्यात असल्याने गावातील नागरिक त्यांना धीर देऊन शांत करीत होते.
यशवर अमरावतीत, कौस्तुभवर श्रीरामपुरात अंत्यसंस्कार
यश किरण वानखेडे याच्यावर अमरावतीत, तर कौस्तुभ संदीप दौड याच्यावर श्रीरामपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. हे दोन्ही विद्यार्थी विनर्स अॅकॅडमीत शिकत होते. या दुर्घटनेत त्यांचाही बुडून मृत्यू झाला. त्यांच्या पालकांनी शवविच्छेदन झाल्यानंतर मुलांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मूळ गावी नेले.
सुमीतचा हट्ट बेतला जीवावर
सुमीत तुकाराम अहिरे याला क्लासच्या मुलांबरोबर कोकणात सहलीला जायचे होते. मात्र, आई-वडिलांनी त्याला सहलीला जाण्यास नकार दिला. या कारणाने तो रुसला होता. ‘मला सहलीला जाण्यासाठी परवानगी द्या, नाही तर मी रूमच्या बाहेर निघणार नाही,’ असे म्हणून सुमीतने स्वतःला खोलीत कोंडून घेतले. शेवटी मुलाच्या हट्टापुढे आई-वडिलांना माघार घ्यावी लागली. ‘आम्ही तुला सहलीला पाठवतो; पण स्वतःची काळजी घे. तुझ्या मित्रांचे नंबर दे, आम्हाला त्यांच्याशी बोलून घेऊ दे,’ असे म्हणून वडिलांनी त्याला सहलीला जाण्यासाठी परवानगी दिली. मात्र, हट्टाने सहलीला गेलेल्या सुमीतला आपला जीव गमवावा लागला.
वंशाचा एकुलता एक दिवा विझला
आयुष्याची नुकतीच सुरुवात झाली होती… डोळ्यांत भविष्याची स्वप्ने आणि मनात पुढच्या शिक्षणाची तयारी होती. मात्र, दिवेआगरच्या समुद्रात बुडून आळंदीतील १८ वर्षीय कैवल्य वासनकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकुलत्या एक मुलाच्या अचानक जाण्याने वासनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मूळचे अमरावतीचे असलेले वासनकर कुटुंब सध्या आळंदीत वास्तव्यास आहे. कैवल्यचे वडील नोकरीनिमित्त गुजरातमध्ये असतात, तर आई शिक्षिका आहे. कैवल्य त्यांचा एकुलता एक मुलगा. दहावीत त्याने चांगले गुण मिळविले होते. सध्या तो अकरावीत शिक्षण घेत होता. कैवल्य अभ्यासात हुशार होता. शिवगर्जना प्रतिष्ठान मंडळाचा तो कार्यकर्ता होता.त्याचा मित्र शंतनु सोळुंके म्हणाला, ‘कैवल्य मनमिळावू आणि मदतीला धावून जाणारा होता. त्याच्या जाण्याने मित्रपरिवारातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.’
