सॅल्यूट! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ, जिल्हा परिषद शाळांना डिजीटल लूक

गदी नर्सरीपासून ते सातवीपर्यंत अनेक शैक्षणिक सुविधा, अद्ययावत डिजीटल ऑनलाइन स्क्रीन, संगणक आदी आधुनिक पद्धतीचे ऑनलाइन शिक्षण सुविधा हजारो किंवा लाखो रुपयांची फी मोजल्यावर विद्यार्थ्यांना मिळतात. यामध्ये काही नवल नाही. पण राज्यातील ग्रामीण भागात प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने शिक्षण मिळाल्यास तो नक्कीच कौतुकाचा विषय आहे. प्राथमिक शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढवा, शिक्षणाची गोडी लागावी यासाठी अत्याधुनिक डिजीटल क्लासरूम काही प्राथमिक शाळांना पुरवण्यात आले आहेत. यामध्ये कोकणातील काही शाळांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील हर्णै उर्दू व गिम्हवणे येथील जिल्हा परिषदेच्या आदर्श केंद्र शाळेचाही समावेश आहे. पहिली ते सातवी विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत डिजीटल क्लासरूम असलेले ‘आयडियल सेंटर’ विद्यार्थ्यांसाठी कुतूहलाचा आणि नाविन्यपूर्ण विषय ठरला आहे.

राज्य शासनाकडून यासाठी काही प्राथमिक शाळांमध्ये ही अद्ययावत सुविधा डिजीटल क्लासरूम एस्टॅब्लिश करण्यात आले आहेत. कोकणातील ग्रामीण भागात असलेल्या विद्यार्थ्यांना त्यामुळे अभ्यासाची आवड आणि गोडी निर्माण होण्यास मदत होणार आहे. अत्याधुनिक स्वरूपाच्या क्लासरूममध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यास तासिका शैक्षणिक वेळेत ॲक्शन मोडवर सुरू झाल्या आहेत.

शासनाकडून 25 ते 30 लाखांचा निधी

पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांसाठी टाईम टेबल तयार करून वर्गाबाहेर लावण्यात आले आहे. याप्रमाणे पहिली ते सातवी या सगळ्याच विद्यार्थ्यांना या क्लासरूमचा उपयोग होतो. शासनाने यासाठी सुमारे 25 ते 30 लाख रुपयांचा निधी खर्च करून काही ग्रामीण भागातील शाळांसाठी अत्याधुनिक डिजीटल क्लासरूम उभे करून दिले आहेत.

अद्ययावत डिजिटल क्लासरूममध्ये इंटरनेट, वायफाय सुविधाही देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्राथमिक शाळेतही अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मिळू लागलं आहे. या डिजीटल क्लासरूमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थीही प्रेमात पडले आहे. या क्लासरूममध्ये बसून अध्ययन करण्यासाठी चिमुकले विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या आवडीने बसून अध्ययन करू लागली आहेत.

विद्यार्थ्यांना कसे शिकवले जाते?

मराठी, विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल असे शैक्षणिक विषय या क्लासरूममधून सोप्या ॲनिमेशनचा उपयोग करून शिकवले जातात. त्यामुळे शासनाच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी आणि पालकांचा ओढा वाढण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना, बौद्धिक कौशल्याला मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.

डिजीटल शाळांमध्ये काय-काय सुविधा?

गिम्हवणे आदर्श केंद्र शाळेत 24 संगणक, अद्ययावत इंटर ऍक्टिव्ह बोर्ड, खास लुक असलेले विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चेअर व बेंचस असा छान लुक या क्लासरूमचा आहे. विद्यार्थी व पालकांच्या व ग्रामस्थांच्याही कौतुकाचा विषय ठरला आहे. ग्रामपंचायत प्रशासक, ग्रामसेवक, सरपंच, माजी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष व गावचे अध्यक्ष यांच्याकडूनही या डिजीटल क्लासरूमचे भेट देऊन कौतुक करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये हा विषय कुतूहलाचा ठरला आहे. या क्लासरूममध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला हेडफोन तसेच प्रश्न विचारण्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *