महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान तयार होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. एकीकडे राज्यातील काही भागांत ऑक्टोबर हिटचा उकाडा जाणवू लागला आहे. येत्या काही दिवसांत राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी दिल्लीसह, राजस्थान, पंजाब, हरियाणाच्या बहुतांश भागातून माघार घेतली आहे. 29 सप्टेंबर रोजी मान्सूनच्या परतीची सीमा कायम होते. मात्र आता दोन ते तीन दिवसांत देशाच्या काही भागातून मान्सून माघार घेण्याती शक्यता आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू असताना कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज राज्यात काही ठिकाणी पावसाने उघडिप दिली आहे. तर काही ठिकाणी उकाडा वाढला असून तापमानात वाढ झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित राज्यात ढगाळ हवामान असेल तर उर्वरित राज्यात उन सावल्यांचा खेळात उन्हाचा चटका वाढण्याचा अदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
देशात ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचे संकेत आहेत. या काळात 85 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरीनुसार ऑक्टोबर महिन्यात देशात 75.4 मिमी पाऊस पडतो. यंदा ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे. तर, देशाच्या बहुतांश भागात कमाल आणि किमान तापमानही सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शुक्रवारपासून वादळी पावसाचा प्रभाव कमी होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होईल. तसेच ऑक्टोबर महिन्यात देशातील बहुंताश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
