सीएसएमटी रेल्वे स्थानकात चित्रपटाच्या ट्रेलरचा कार्यक्रम; गर्दीमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण, रेल्वे प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

:छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)येथे मंगळवारी सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत चित्रपटाच्या ट्रेलरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. फलाट क्रमांक ७ आणि ८ दरम्यान सायंकाळी सात ते आठ या वेळेत झालेल्या या कार्यक्रमासाठी फलाट क्रमांक ७ च्या काही भागात बॅरिकेड्स लावण्यात आले होते. त्यामुळे लोकलमध्ये चढताना आणि उतरताना प्रवाशांची कसरत झाली. गर्दीच्या वेळेत स्थानकात कार्यक्रमाला परवानगी देण्यावरून मध्य रेल्वेच्या निर्णयाबाबत प्रवाशांनी प्रश्न उपस्थित केले.

गोंधळाची परिस्थिती निर्माण

सायंकाळी कार्यालये सुटण्याची वेळ असल्याने सीएसएमटीवर नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी असते. याच वेळेत फलाटाचा काही भाग कार्यक्रमासाठी वापरण्यात आल्याने लोकलमध्ये चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी प्रवाशांना उपलब्ध जागेचा वापर करावा लागत होता. हार्बर दिशेकडील दरवाजातून चढ-उतार करताना आधीच गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये प्रवाशांची लगबग झाली. लोकलमधून उतरणारे आणि लोकलमध्ये चढणारे प्रवासी एकाच ठिकाणी आल्याने काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे प्रवाशांनी सांगितले.

फलाटावरील जागेचा कार्यक्रमासाठी

सीएसएमटी हे मुंबईतील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून, सकाळी आणि सायंकाळी येथे मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेत फलाटावरील जागेचा कार्यक्रमासाठी वापर केल्यास प्रवाशांच्या हालचालींवर परिणाम होण्याची शक्यता असते.

प्रवाशांची गैरसोय

प्रवाशांची सुरक्षित हालचाल आणि लोकलमध्ये चढ-उतरण्याची प्रक्रिया सुरळीत राहणे आवश्यक असल्याचे प्रवाशांनी सांगितले. रेल्वे स्थानकांच्या व्यावसायिक वापरातून महसूल मिळवण्यासाठी मध्य रेल्वेकडूनविविध उपक्रम राबवले जात आहेत. मात्र, अशा उपक्रमांमुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्यास त्याबाबत योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचे प्रवाशांनी म्हटले.

प्रवाशांचा सवाल

‘चित्रपटांचे ट्रेलर दाखविण्यासाठी शहरात मोठ्या स्क्रीनची सुविधा उपलब्ध आहे. सीएसएमटीसारख्या गर्दीच्या स्थानकात, तेही गर्दीच्या वेळेत, असा कार्यक्रम घेण्याची गरज काय’, असा सवाल प्रवाशांनी केला. रेल्वेने महसूल मिळविण्यासाठी व्यावसायिक उपक्रम राबवावेत; मात्र त्यासाठी प्रवाशांची गैरसोय होऊ नये, अशी प्रतिक्रिया काही प्रवाशांनी व्यक्त केली. ‘रेल्वेच्या गर्दीत एखादी दुर्घटनाही घडू शकते. त्यामुळे गर्दीच्या वेळेत प्रवाशांची सुरक्षिततामहत्त्वाची आहे,’ असेही प्रवाशांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *