मालाड परिसरात एका कुटुंबाने त्यांच्या ८० वर्षांच्या वडिलांचं पार्थिव तब्बल चार वर्षे फ्रीझरमध्ये जतन करून ठेवल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली. वडिलांचं शव जतन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्यांच्या मुलांची मनधरणी करीत पोलिसांनी बुधवारी या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, असा प्रकार पहिल्यांदाच समोर आल्यामुळे नेमकी कारवाई कोणती करावी, असा प्रश्न पोलिसांना पडला असून त्याबाबत सल्ला घेतला जात आहे.
50 लाखांहून अधिक खर्च
मालाडच्या कुरार परिसरात राहणाऱ्या ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू जून २०२२ मध्ये कर्करोग आणि हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाने अंत्यसंस्कार न करता त्यांचा मृतदेह मालाडमधील एका बंद डे-केअर सेंटरच्या फ्रीझरमध्ये लपवून ठेवला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर कुरार पोलिसांचे पथक डॉक्टर सय्यद चालवत असलेल्या दे केअर सेंटरमध्ये पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. चार वर्षात सुमारे ५० लाखांहून अधिक रक्कम खर्च करून त्यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह जतन करून ठेवला होता.
