शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी प्रदीप पुर्णेकर यांची त्यांच्या कार्यालयात गोळी झाडून तसेच धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारण्याच्या घटनेने. ठाण्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सप्टेंबर महिन्यात ठाणे शहरात जीवे मारण्याच्या पाच घटना घडल्या असून, त्यात एका पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येचाही समावेश आहे. या घटनांमुळे ठाणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोपी मोकाट राहत असल्याचीही चर्चा
ठाणे शहरासह पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलिस यंत्रणा अपयशी ठरत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. चोऱ्या, घरफोड्या, अपहरण, महिलांच्या गळ्यातील दागिने खेचणे यांसारखे गुन्हे सातत्याने नोंदवले जात आहेत. गंभीर गुन्ह्यांची उकल कमी प्रमाणात होत असल्याने आरोपी मोकाट राहत असल्याचीही चर्चा आहे.
शहरात वर्दळीच्या आणि मोक्याच्या ठिकाणीही हत्या होत असल्याने पोलिस गस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाईबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
सप्टेंबरमधील घटना
. कापुरबावडी नाका परिसर:राजू गुजराती यांना जीवे मारल्याची घटना
. वागळे इस्टेट:धारधार शस्त्राने वार करून संदीप साळवे यांना जीवे मारल्याची घटना
. घोडबंदर परिसर : एका महिलेला जीवे मारण्यात आले
.ठाणे:डोक्यात सिमेंटची वीट मारून पोलिस उपनिरीक्षक किसन भोईर यांचा मृत्यू
.ठाणे :गोळीबार आणि शस्त्राने वार करून प्रदीप पुर्णेकर यांना जीवे मारल्याची घटना
