बारामतीमधील शेरेवाडी येथे मध्यरात्री घरात झोपलेल्या दोन वयोवृद्ध महिलांची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी पहाटे उघडकीस आली. कृष्णाबाई लडकत आणि इंदुमती लडकत अशी मृत महिलांची नावे आहेत. दोघींची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली? याचा उलगडा अद्याप झालेला नसून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. एकाच ठिकाणी दोन महिलांच्या हत्येच्या घटनेनं शेरेवाडी परिसरासह संपूर्ण बारामती तालुक्यात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही महिला रात्री घरात झोपलेल्या असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत दोघींचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांकडून उपलब्ध पुरावे संकलित करण्याचं काम सुरू आहे. हत्येचा प्रकार नेमका कसा घडला? आणि त्यामागे कोणतं कारण आहे? याचा तपास केला जात आहे.
