परतीच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत असतानाच काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींची नोंद होत आहे. तर, राज्यात पाऊस ओसरला असताना उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. ऑक्टोबर महिना सुरू होण्याआधीच उन्हाचा चटका जाणवायला लागला आहे. तर, कोकण, मध्य महाराष्ट्रांत विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी बुधवारी राजधानी दिल्लीसह राजस्थान, पंजाब, हरियाणाच्या बहुतांश तर गुजरात उत्तर प्रदेशच्या काही भागांतून माघार घेतली आहे. तर पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये 1.5 ते 4.5 किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. उत्तर कर्नाटकपासून तामिळनाडूपर्यंत समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
आज कोकणातील रायगड, रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक घाटमाथा, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात वादळी वारे विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. असे असली तरी राज्यातील काही भागात उष्णतेत वाढ झाली आहे. सोलापूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, अकोला या जिल्ह्यांत तापमानाचा पारा 35 पार गेला होता.
परतीचा पाऊस कधी?
हवामान अभ्यासक अश्रेय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवसांत परतीचा पाऊस महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता असून, याच चार ते पाच दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी परतीचा पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे
तापमानात वाढ
1 ऑक्टोबरपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल, असा अंदाज आहे. 9 ते 22 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील इतर भागांमध्येही उष्णतेचे प्रमाण वाढू शकते.
30 सप्टेंबरला पावसाळा संपल्याचे जाहीर करण्यात येते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पाऊस असला तरी पावसाळ्यातील पाऊसमान हे 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीसाठी मोजले जाते. गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या प्रणालीचा फायदा पूर्व आणि ईशान्य भारत तसेच वायव्य भारत क्षेत्रातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड सारख्या राज्यांना झाल्याने सरासरी पाऊसमान वाढायला मदत झाली आहे.
