इंडोनेशियातील बाली येथे अटक केलेल्या गँगस्टर छोटा राजनला मंगळवारी रात्रीच भारतात आणले जाणार होते. मात्र ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे इंडोनेशियातील विमानसेवा बंद ठेवल्याने छोटा राजनचे आगमन लांबले आहे.
छोटा राजनच्या प्रत्यार्पणासंदर्भातील औपचारिकता पूर्ण झाली आहे. मात्र बालीजवळच ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे इंडोनेशियामधील विमानसेवा ठप्प आहे. बाली येथील विमानतळ अद्यापही बंद आहे. त्यामुळे राजनचे आगमन लांबले असून राजनला आज भारतात आणले जाण्याची शक्यता आहे.
छोटा राजनला कुठे ठेवले जाणार हे अजून नक्की ठरलेले नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार छोटा राजनला मुंबईतील ऑर्थर रोड कारागृह येथे ठेवले जाणार आहे. मात्र आधी सीबीआय आणि दिल्ली पोलीस छोटा राजनची कसुन चौकशी करतील आणि त्यानंतरच त्याला मुंबईत पाठवले जाण्याची शक्यता आहे.