पोटच्या पोराच्या विक्री प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; आई-बापाने विक्रीच्या पैशातून खरेदी केले सोने अन् ब्रँडेड स्मार्टफोन

पोटच्या अवघ्या एक महिन्याच्या चिमुकल्याचा १ लाख २० हजार रुपयांत सौदा करून, त्या पैशांमधून दोन ब्रँडेड स्मार्टफोन आणि ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी करून मौजमजा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २४ सप्टेंबर रोजी उघडकीस आलेल्या या धक्कादायक बाळ विक्री प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करत जन्मदात्यांसह बाळाची हैदराबादपर्यंत तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटमधील तब्बल ७ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी हैदराबादहून बाळाची सुरक्षित सुटका केली असून बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार एका संस्थेकडे सुपूर्द केले आहे.

कौशल्या पवार आणि तिची मुलगी सीमा रेशवाल (दोघी रा. पस्तीशी, छ. संभाजीनगर) असे मुख्य मध्यस्थ आरोपींचे नाव आहे. तर संगीता आव्हाड (वय ३५, रा. पडगाव), गुंटूक व संगीता, स्वतःला डॉक्टर सांगणारा सुरेश राजाराम गुंटुका (वय ४४, रा. जगतीयाल, तेलंगणा) आणि उमा गंगाधर खटकमे (वय ४२, रा. तालागड, हैदराबाद) अशी इतर अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या जोडीदारापासून विभक्त होऊन दोन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याला ५ जुलै रोजी मुलगा झाला होता. दारूचे व्यसन आणि निर्दयीपणातून या दाम्पत्याने बाळाची विक्री केली. कौशल्या पवारने मुलगी सीमा रेशवालसोबत व्यवहार ठरवून ७ ऑगस्टला १.२० लाख रुपये रोख देऊन बाळाचा ताबा घेतला. यानंतर सीमाने हे बाळ नातेवाईक संगीता आव्हाडला २ लाख ७० हजारांत विकले. संगीताने नांदेड गाठून स्वतःला डॉक्टर सांगणाऱ्या सुरेश गुंटुका याच्यामार्फत ते बाळ थेट हैदराबाद येथील उमा खटकमे या महिलेला तब्बल ३ लाख ५० हजारांत विकले. ४८ तासांत हे बाळ चार हातांतून फिरत थेट तेलंगणात पोहोचले होते.

कुटुंबाला आरोपी करण्याची धमकी देताच उघडले तोंड; मुकुंदवाडी पोलिसांत गुन्हा नोंद

याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश्वर घुगे, अंमलदार राजाभाऊ कोल्हे, देविदास खेडकर यांनी सुरुवातीला जन्मदात्यांसह सीमा व कौशल्याला ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत सीमा तोंड उघडत नव्हती; मात्र पोलिसांनी तिच्या संपूर्ण कुटुंबाला आरोपी करून अटकेची तयारी दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. मुकुंदवाडी पोलिसांनी २४ सप्टेंबर रोजी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला असून सर्व ७ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या खरेदी-विक्रीच्या साखळीतील पैशांच्या व्यवहाराचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *