‘दोन प्रौढ व्यक्तींचे संमतीने विवाहबाह्य शारीरिक संबंध असल्याचे पुरावे…’, हायकोर्टाकडून काँग्रेस खासदाराची निर्दोष मुक्तता

उत्तर प्रदेशातील सीतापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार राकेश राठोड यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 2025 मध्ये एका महिलेने राकेश राठोड यांच्याविरोधात बलात्कार आणि लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणामध्ये आता अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने त्यांना निर्दोष मुक्त केले आहे. न्यायालयाने हा निकाल देताना दोन्ही प्रौढ व्यक्तींमध्ये परस्पर संमतीने शरीरसंबंध होते असं नमूद केलं आहे. नेमकं हे प्रकरण काय आणि यासंदर्भात न्यायालयात काय घडलं जाणून घेऊयात सविस्तरपणे…

नेमकं हे प्रकरण काय आणि महिलेची तक्रार काय?

जानेवारी 2025 मध्ये सीतापूरमधील एका विवाहित महिलेने पोलीस ठाण्यात राकेश राठोड यांच्याविरोधात  एफआयआर दाखल केला. तिने आरोप केला की, 2018 मध्ये राठोड आमदार असताना त्यांची एकमेकांशी ओळख झाली. राठोड यांनी मला राजकीय मदत करण्याचं आणि नंतर पत्नीला घटस्फोट देऊन लग्न करण्याचे वचन दिले होते, असं या महिलेने तक्रारीत म्हटलं. मार्च 2020 मध्ये त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावून माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर सुमारे चार वर्षे लग्नाचे वचन देऊन त्यांनी माझे लैंगिक शोषण केले, असं या महिलेने तक्रारीत म्हटलं होतं. या महिलेची तक्रार भारतीय न्याय संहितेच्या बलात्कार, फसवणुकीने शारीरिक संबंध ठेवणे आणि धमकी या कलमांखाली नोंदवण्यात आली. राठोड यांनी आरोप फेटाळले होते आणि राजकीय कट असल्याचे म्हटले होते.

न्यायालयाने निकाल देताना काय म्हटलं?

न्यायालयाने या प्रकरणामध्ये दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निकाल देताना, तपासातील पुरावे दोन विवाहित आणि प्रौढ व्यक्तींमधील दीर्घकाळ चाललेल्या परस्पर संमतीने झालेल्या विवाहबाह्य शारीरिक संबंधांचे संकेत देत असल्याचं निरिक्षण नोंदवलं आहे. लग्नाचे वचन देऊन बलात्कार झाल्याचा आरोप प्रथमदृष्ट्या संशय निर्माण करत नाही. अशा विरोधाभासी आरोपांवर खटला चालवणे कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग ठरेल, असे न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाने राठोड यांना सर्व आरोपांमधून मुक्त करत मोठा दिलासा दिला आहे.

संपूर्ण घटनाक्रम अगदी थोडक्यात

15-17 जानेवारी 2025: महिलेने राकेश राठोड यांच्याविरुद्ध तक्रार दिली आणि एफआयआर दाखल झाला.

29 जानेवारी 2025: अलाहाबाद उच्च न्यायालयाने राकेश राठोड यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

30 जानेवारी 2025: पोलिसांनी राकेश राठोड यांच्या घरी पत्रकार परिषद सुरू असताना त्यांना अटक केली. त्यांना सीतापूर जिल्हा तुरुंगात पाठवण्यात आले.

मार्च 2025: उच्च न्यायालयाने राकेश राठोड यांना जामीन दिला. सुमारे 48 दिवसांनंतर ते तुरुंगातून बाहेर आले.

मे 2025: खटल्याच्या न्यायालयाने आरोपमुक्तीची अर्ज फेटाळला आणि आरोप निश्चित केले.

25-26 सप्टेंबर 2026: अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठासमोर न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांनी खटल्यातील न्यायालयाचा आदेश रद्द करून राठोड यांना सर्व आरोपांमधून मुक्त केले.

राठोड यांच्याबद्दल थोडक्यात

राकेश राठोड ओबीसी समाजातील नेते आहेत. ते काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी बहुजन समाजवादी पार्टी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये होते. 2017 मध्ये सीतापूर सदर विधानसभा मतदारसंघातून भाजप आमदार म्हणून निवडून आले होते. 2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर सीतापूरमधून ते खासदार झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *