वृंदावनचे प्रसिद्ध कथावाचक प्रेमानंद महाराज यांचे शिष्य दीपक लोथी यांच्या मृत्यू प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहे. दीपक लोथी शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास आश्रमाच्या छतावरुन उडी घेत आत्महत्या केली. आता या प्रकरणात वृंदावनचे सीईओ संदीप कुमार सिंह यांच्या म्हणण्यानुसार, सीसीटीव्ही तपासल्यानंतर प्रथमदर्शनी ही आत्महत्याच असल्याचे वाटते. मात्र तरीही कुटुंबीयांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक लोधी यांचा शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. त्यानुसार दीपकचा मृत्यू हा अति रक्तस्त्रावामुळं झाला आहे. मात्र रक्तस्राव कसा व का झाला याचे कारण तज्ज्ञच सांगू शकतील. मात्र गच्चीवरुन खाली कोसळल्यामुळंही गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यामुळंही अतिरक्तस्राव झाला असू शकतो.
दरम्यान, ज्या खोलीत दीपक राहत होते तिथे एक ग्राइंडर सापडला आहे. तसंच, मयत व्यक्तीचे गुप्तांगही कापण्यात आल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, दीपक यांनीच प्रायव्हेट पार्ट कापल्याचे समोर येतेय. तसंच, वेदना जास्त होऊ नयेत म्हणून त्यांनी काही पदार्थांचे सेवन केले असावे, असाही संशय पोलिसांना आहे. दीपक यांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. तसंच हे कसं घडलं याचा तपास करण्यात येत आहे. सध्य तरी दीपक लोधी यांच्यावर वृंदावनमध्येच अत्यंसस्कार करण्यात आले आहेत.
दीपक लोधी यांचा आश्रमाच्या छतावरुन खाली पडतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला होता. यात दीपक थेट खाली कोसळताना स्पष्ट दिसत आहेत. त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याचेही दिसत आहे. गच्चीवरुन उडी मारण्याआधी ते काही क्षण तिथे बसले होते. त्यानंतर त्यांनी उडी मारली. मात्र तेव्हाही गुप्तांग कापल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची वेदना दिसत नव्हती. सध्या मथुरा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. ही आत्महत्या आहे की या मागे कोणाचा हात आहे का? याचा तपासही करण्यात येणार आहे. फॉरेन्सिक टीमदेखील घटनास्थळावरुन पुरावे गोळा करत आहेत.
2 वर्षांपासून कुटुंबापासून दूर होते
दीपक लोधी यांच्या आत्महत्यानंतर त्यांचे नातेवाईकांनी एक महत्त्वाची माहिती सांगितली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, दीपक 2024 पासून प्रेमानंद महाराजांच्या आश्रमत होते. तेव्हापासून त्यांनी कुटुंबीयांशी कोणताच संपर्क ठेवला नव्हता. आश्रमातील लोकांनीही त्यांना कधी कुटुंबीयांशी भेटू दिलं नाही. त्याचे कुटुंबीय आश्रमाबाहेर 2-2 तास त्यांची वाट पाहून निघून जात असे. दीपककडे मोबाईलदेखील नव्हता त्यामुळं कोणीच त्याच्या संपर्कात नव्हते.
