गणपती विसर्जन बंदोबस्ताची रात्रभर ड्युटी बजावून घरी परतलेल्या नागपूर पोलिस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) रवींद्र महादेवराव कोकांडे (५६) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
नागपूर शहर पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले रवींद्र कोकांडे हे शनिवारी, २६ सप्टेंबरच्या रात्री पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणपती विसर्जन बंदोबस्तावर तैनात होते. ड्युटी पूर्ण करून ते मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास कामठी मार्गावरील रझा टाऊन येथील घरी परतले. घरी जेवण करून ते विश्रांतीसाठी झोपले.
छातीत अचानक तीव्र वेदना
पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यांनी मुलगा ऋषभ याला आवाज दिला. ऋषभने त्यांना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. हृदयविकाराच्या झटक्याने त्रास होत असल्याचे समजले. तेथून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र उपचारादरम्यान सकाळी ११.२७ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
शासकीय इतमामात अखेरचा निरोप
रवींद्र कोकांडे यांच्या पार्थिवावर कपिलनगर घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकारी, सहकारी अंमलदार आणि नागरिकांच्या उपस्थितीत हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना शोकसलामी देण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी शीला कोकांडे, मुलगा ऋषभ आणि रोहित असा परिवार आहे.
