पुण्यात आणखी एका वैष्णवीचा हुंडाबळी? लग्नाच्या 4 महिन्यांतच आयटी इंजिनिअरने जीवन संपवलं, मृत्यूआधी आईला…

पुण्यात आणखी एका वैष्णवीचा हुंडाबळी गेला आहे. सासरच्या छळाला कंटाळून अवघ्या 4 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेने आत्महत्या केली आहे. वैष्णवी ओंकार गिसरे असं तरुणीचे नाव असून तिचे वय अवघे 23 वर्षे इतके आहे. या प्रकरणी वैष्णवीच्या वडिलांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात तिचे पती व सासू-सासर्‍यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवीचा सासरच्यांकडून हुंड्यासाठी सातत्याने छळ होत होता. चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरकडून पाच लाख रुपये आणावेत,अशी मागणी  करत छळ होत होता. त्यामुळं अवघ्या चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या आयटी इंजिनियर विवाहितेने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गुरुवारी  रात्री ही घटना घडली आहे.

वैष्णवी ओंकार गिसरे (वय 23, रा. वृंदावन सोसायटी, वडाचीवाडी, पुणे) असे या महिलेचे नाव असून तिचे वडील प्रवीण रघुनाथ जरांडे (वय 51, या. कोडीत खुर्द, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात तिचे पती व सासू-सासर्‍यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

काळेपडळ पोलिसांनी जरांडे यांच्या फिर्यादीनुसार वैष्णवीचा पती ओंकार संजय गिसरे (वय 28), सासरे संजय महादेव गिसरे (वय 49) व सासू रुपाली संजय गिसरे (वय 42) सर्व रा. वृंदावन सोसायटी, वडाचीवाडी, पुणे) यांच्यावर हुंडा प्रतिबंधक कायदा व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

वैष्णवीचा विवाह 9 मे 2026 रोजी ओंकार गिसरे याच्याशी झाला होता. विवाहावेळी माहेरच्यांनी सुमारे 45 लाख रुपये खर्च करून 10 तोळे सोने दिले होते.त्यानंतरही चारचाकी वाहन खरेदीसाठी पाच लाख रुपयांची मागणी मागणी केली जात होती. त्यासाठी वैष्णवीचा मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.

24 सप्टेंबर रोजी रात्री वैष्णवीने आईशी फोनवरुन संपर्क साधला होता. तेव्हा तिने सासरी होणाऱ्या छळाबाबत सांगितले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास तिच्या पतीनेही माहेरच्याशी संपर्क साधला होता, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. मात्र त्यानंतर वैष्णवीशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. तिचे आई-वडील पुण्यात तिला भेटण्यासाठी आले होते. तेव्हा वैष्णवीचा निष्प्राण देह त्यांच्यासमोर आला. तिने गळफास घेत आत्महत्या केल्याचा दावा सासरच्या मंडळीने केला आहे. मात्र हा घातपात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *