अशोक खरात प्रकरणाचा भांडाफोड करणारा ‘तो’ पत्रकारच अडकला; महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे 1 लाखाची खंडणी मागितली अन्…; नेमकं काय घडलं?

श्रीरामपूर तालुक्यातील फत्त्याबाद येथील एका महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे स्मशानभूमीच्या विकासकामात १ लाख रुपयांची खंडणी मागून जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात कथित पत्रकार दत्तात्रय खेमनार याच्यावर खंडणी, ॲट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी माधवी नामदेव पलघडमल (वय ४५) या सन २०२२ पासून फत्त्याबाद ग्रामपंचायत कार्यालयात ग्राम विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सध्या फत्त्याबाद गावातील स्मशानभूमीत मुरूम टाकून जमीन समतल करण्याचे शासकीय काम सुरू आहे. गुन्ह्याच्या प्रथम माहिती अहवालानुसार (FIR), चांदेवाडी येथील रहिवासी दत्तात्रय पोपट खेमनर हा गेल्या १० ते १२ दिवसांपासून महिला अधिकाऱ्याला फोन करून वारंवार त्रास देत होता. स्वतःला पत्रकार असल्याचे सांगून, “मी भल्या-भल्यांना कामाला लावतो, मला स्मशानभूमीच्या कामात १ लाख रुपये द्यावे लागतील, नाहीतर तुला काम करू देणार नाही, खोट्या केसमध्ये अडकवून तुझी नोकरी घालवेन,” अशी धमकी त्याने दिली होती.

आरोपीच्या त्रासाला आणि धमक्यांना घाबरून फिर्यादी महिला अधिकाऱ्याने १४ सप्टेंबर रोजी १,१०० रुपये ऑनलाईन वर्ग केले होते. मात्र, तरीही आरोपीचा तगादा सुरूच राहिला. एवढेच नव्हे तर, त्याने मुरूम पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडूनही पैसे उकळल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. सदर प्रकरणी दत्तात्रय खेमनारला रात्री अटक झाली आहे

२४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता फत्त्याबाद येथील स्मशानभूमीत JCB च्या साह्याने मुरूम लेव्हल करण्याचे काम सुरू असताना, आरोपी दत्तात्रय खेमनार काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून तिथे आला. त्याने प्रत्यक्ष काम करणाऱ्या सागर चांदे व संकेत पाडेकर या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत काम तात्काळ थांबवण्यास भाग पाडले.

या सततच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी महिला अधिकाऱ्याने लोणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी दत्तात्रय पोपट खेमनर याच्याविरोधात:

खंडणी मागणे

शासकीय कामात अडथळा निर्माण करणे

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा (ॲट्रॉसिटी)

मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देणे

या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे, आरोपी दत्तात्रय खेमनार हा यापूर्वी चर्चेत आलेल्या ‘अशोक खरात प्रकरण’ समोर आणणारा पत्रकार म्हणून ओळखला जातो. आता त्याच्यावरच थेट १ लाखाच्या खंडणीचा आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *