देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानींना मागे टाकणारे गौतम अदानी यांची कंपनी आता हवाई वाहतूक क्षेत्रातही प्रवेश करू शकते अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताचे हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी नवी दिल्ली आणि मुंबई विमानतळावरील चालकांना म्हणजेच विमानतळ व्यवस्थापकांना विमान कंपन्यांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सेदारी ठेवण्यावर निर्बंध घालणारा नियम शिथिल करण्याचे संकेत दिले आहेत. यासंदर्भात सरकार विचार करत सल्याचं नायडू यांनी सांगितलं. एअर इंडिया आणि इंडिगो या दोन कंपन्यांच्या देशांतर्गत मत्तेदारीला आळा घालण्याच्या उद्देशाने सरकार हा निर्णय घेऊ शकते असं सांगितलं जात आहे.
बंगळूरूसारख्या विमानतळांचं व्यवस्थापन करणाऱ्यांना विमान कंपन्या सुरू करण्यास नियमांमध्ये मनाई नसली तरी, संचालन आणि व्यवस्थापन करारामुळे दिल्ली आणि मुंबईतील विमानतळांना विमान कंपन्यांवर नियंत्रण ठेवता येत नाही,” असे नायडू यांनी मंगळवारी नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितले. “अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही,” असेही ते म्हणाले. ‘ब्लूमबर्ग न्यूज’ने जुलैमध्ये या प्रस्तावासंदर्भात वृत्तांकन केलं होतं.
भारतात दोनच दादा कंपन्या
जगातील चौथ्या क्रमांकाच्या सर्वात मोठी हवाई वाहतूक बाजारपेठ असलेल्या भारतात, इंडिगो आणि एअर इंडिया 10 पैकी 9 देशांतर्गत प्रवाशांना विमानसेवा पुरवतात. मध्यंतरी इंडिगोसंदर्भातील गोंधळाच्या वेळी अनेकदा भारतात कशाप्रकारे पर्यायी विमान कंपन्याची गरज आहे यासंदर्भात बरीच चर्चा झालेली.
नायडू म्हणाले पाच कंपन्यांची गरज
“भारताला किमान पाच विमान कंपन्यांची गरज आहे, ज्यांच्याकडे प्रत्येकी किमान 100 विमाने असतील,” असे नायडू म्हणाले. नवीन एअरलाइनसाठी अर्ज करणाऱ्या कोणाचाही विचार करण्यास आम्ही तयार आहोत, असंही नायडू यांनी स्पष्ट केलं.
अदानींचा मार्ग मोकळा
मालकी हक्कावरील निर्बंध शिथिल केल्यास, मुंबई आणि इतर सात विमानतळांचे संचालन करणाऱ्या अदानी समूहाला आणि नवी दिल्ली व आणखी चार विमानतळांचे व्यवस्थापन करणाऱ्या जीएमआर एअरपोर्ट्सला विमान कंपन्यांची मालकी घेता येईल.
सध्या भारतात कोणते पर्याय?
जेट एअरवेज इंडिया लिमिटेड आणि गो एअरलाइन्स इंडिया लिमिटेड यांचे पतन, तसेच टाटा समूहाअंतर्गत विस्तारा आणि एअरएशिया इंडिया यांचे विलीनीकरण झाल्यामुळे, इंडिगो आणि एअर इंडिया सध्या आघाडीवर आहेत. नवीन कंपन्यांपैकी अकासा एअर, अजूनही संघर्ष करत असलेली मात्र तुलनेनं जुनी असलेली स्पाईसजेट लिमिटेड आणि लहान प्रादेशिक विमान कंपन्या भारतात जेमतेम आपला व्यवसाय चालवतात.
