डीजेबंदी आणि ध्वनीप्रदुषणाच्या मुद्द्यावरुन परखड भूमिका मांडणारे विद्यानंद बापट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अलीकडेच भारताच्या निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक अशा एकूण 5 विधानपरिषद मतदारसंघांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा केली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून विद्यानंद बापट निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळं राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.
असीम सरोदे यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ‘विद्यानंद बापटने पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवावी का?’ असा सवाल पुणेकरांना केला आहे. सरोदे यांच्या ट्विटमुळं आता बापटही राजकारणात उतरणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. ध्वनीप्रदूषणाविरोधात बापट निर्भयपणे भूमिका मांडत असल्याचा उल्लेखही सरोदेंनी पोस्टमध्ये केला आहे.
असीम सरोदे यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?
माझ्यासोबत उभ्या असलेल्या व्यक्तीचा आता खूप परिचय देण्याची आवश्यकता उरली नाही. ध्वनिप्रदूषणाच्या राक्षसा विरोधात निर्भयपणे उभा असणारा ‘विद्यानंद बापट’. अनेकांच्या मनातील दुःख बोलणारा आणि उत्सवांचे विकृत स्वरूप, त्यातील ओंगळवाणेपणा चव्हाट्यावर आणणारा हिरो ठरला आहे. तर, विद्याविभूषित, सुसंकृत, विनम्र, अभ्यासू, प्रत्येक सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारा विद्यानंद बापट आज जणू प्रत्येक घरातील आपुलकीचा सदस्य झालेला आहे. भाषेचा स्तर बिघडू न देता, विषयाला धरून बोलणारा आणि समाजाला वैश्विक बनविण्याची क्षमता असणाऱ्या विद्यानंद बापट ने पदवीधर मतदारांमधून निवडणूक लढवावी का? तुम्हाला काय वाटते? असा सवाल असीम सरोदेंनी केला आहे.
दरम्यान, गणेशोत्सवात डीजे-डॉल्बीविरोधातील भूमिकेमुळे बापट चर्चेत आले होते. विद्यानंद बापट यांनी मांडलेल्या भूमिकेमुळं राजकारणातही दोन मतप्रवाह पाहायला मिळाले होते. तर, अनेक पुणेकरांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले होते. डीजेबंदीविरोधी भूमिका घेतल्यानंतर त्यांच्यावर हल्लादेखील झाला होता. बापटांवर हल्ला झाल्यानंतरही ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते. पण आता असीम सरोदेंच्या सूचक पोस्टनंतर बापटांच्या राजकीय प्रवेशाबाबतच्या चर्चांना वेग आला आहे. तसंच, सरोदेंच्या पोस्टवर पुणेकर आणि राज्यभरातील नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
