मुख्याध्यापक मुलींच्या वॉशरूममध्ये घुसून…, रडत रडत विद्यार्थिनींनी सांगितला हादरवणारा घटनाक्रम; पालक थेट शाळेत पोहोचले अन्…

बिहारमधल्या जमुईमध्ये दोन किशोरवयीन मुलांचा कथित छळ झाल्याच्या घटनेवरून संताप व्यक्त होत असतानाच नवं हादरवून टाकणारं एक ताजं प्रकरण समोर आलं आहे. बिहारमधील नवादा येथील एका सरकारी शाळेतील विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकांवर गंभीर आरोप केले आहेत. या शाळेचे मुख्याध्यापक मुलींच्या वॉशरूममध्ये घुसून अयोग्यरित्या विद्यार्थिनींना स्पर्श करत असल्याचा आरोप या मुलींनीच केला आहे. या आरोपांमुळे आता पुन्हा एकदा शाळांमधील अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणावरुन काँग्रेस नेते पवन खेडा यांनी महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून बिहारमधील भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर टीका केली आहे.

या दोन घटनांवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते पवन खेडा यांनी बिहारमधील भाजप सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे. आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवरील एका पोस्टमध्ये खेडा यांनी, “बिहारमधील भाजपने शरमेने तोंड काळे करून घ्यायला हवे. एका बाजूला, जमुईमध्ये गुंडांनी एका किशोरवयीन मुलाचा आणि मुलीचा छळ केला व त्यांच्याशी छेडछाड केली. आणि आता, बिहारमधील नवादा येथे लहान मुली रडत आहेत कारण त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक वॉशरूममध्ये डोकावतात आणि त्यांना अयोग्यरित्या स्पर्श करतात. बिहारमध्ये असो किंवा भारतातील इतर कोणत्याही भागात असो महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने असं घडणं हे अत्यंत लज्जास्पद आहे,” असं म्हटलंय. तसेच पुढे बोलताना, “बिहार सरकारने पोलिसांची कामगिरी, उत्तरदायित्व आणि मूलभूत सामाजिक सुव्यवस्था यांचे निकष उंचावण्याची अत्यंत गरज आहे. जर मुलींना रस्त्यावरून चालताना किंवा शाळेतील प्रसाधनगृह वापरताना भीती वाटणार नाही, अशी स्थिती सरकारला निर्माण करता येत नसेल, तर त्यांनी लाज वाटून सत्तेतून पायउतार झाले पाहिजे,” असे त्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे.

कठोर कारवाईची मागणी

नवादा येथील प्रकरणामुळे अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये अधिक भक्कम उपाययोजना असण्याची गरज, तसेच लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झाल्यास त्यावर कायद्यानुसार आणि त्वरित कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे मुद्देही अधोरेखित होत असून या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जतोय. शाळेच्या मुख्याध्यापकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

जमुई येथे काय घडले?

नवादा येथील प्रकरण जुमईनंतर समोर आलं आहे. जमुईमध्ये अल्पवयीन मुलींशी संबंधित घटना देशभरामध्ये चर्चेत असतानाच पुन्हा बिहारमधील असं विचित्र प्रकरण समोर आल्याने बिहारमध्ये मुली सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित केला जातोय. जुमई येथे दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा काही पुरुषांच्या ग्रुपने रस्त्यावर कथित लैंगिक छळ केला. तसेच तिच्या मित्राही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये छळ सुरू असताना ती मुलगी आरोपींना आपल्याला सोडून देण्याची विनवणी करताना दिसत आहे. जमुई येथील घटनेमुळे संताप व्यक्त केला जात असून सार्वजनिक ठिकाणी मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. जुमईमधील व्हायरल व्हिडीओनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपीला अटक करण्यात आली आहे. एन्काऊंटरदरम्यान त्याच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला असता त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *