पावसापासून बचावासाठी शेतातील मंदिराचा आसरा घेतला, मात्र याच मंदिर परिसरात वीज कोसळल्याने दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील तिष्टी खुर्द शिवारात ही हृदयद्रावक घटना घडली. रात्री उशिरापर्यंत दोन्ही भाऊ घरी न परतल्याने सुरू झालेल्या शोधाशोधीनंतर ही घटना उघडकीस आली. टिबुराज राजेराम कानफाडे (६४) आणि लक्ष्मण घनश्याम कानफाडे (५३), अशी मृतकांची नावे आहेत. दोघेही तिष्टी खुर्द येथील रहिवासी असून शेती व्यवसाय करीत होते. दोन्ही भाऊ कष्टाळू शेतकरी म्हणून परिसरात परिचित होते. टिबुराज हे शेतीसोबतच पोलिस दलात होमगार्ड म्हणूनही काम करत होते.
शनिवारी दोन्ही भाऊ नेहमीप्रमाणे आपापली बैलजोडी, गायी आणि इतर जनावरे घेऊन तिष्टी खुर्द शिवारातील शेतात गेले होते. दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास शिवारात अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर वाढत असतानाच विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी दोन्ही भावांनी शेतातील मातामाय मंदिराचा आसरा घेतला. मात्र, मंदिर परिसरातच जोरदार वीज कोसळली. या दुर्घटनेत दोन्ही भाऊ होरपळून गंभीर जखमी झाले आणि काही वेळातच त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. शिवारात त्यावेळी अन्य कोणीही नसल्याने दोघांना वेळीच मदत मिळू शकली नाही. त्यामुळे मदत पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला असावा, मंदिराजवळील कडुनिंबाच्या झाडावरही वीज कोसळल्याचे निशाण आढळून आले. त्यामुळे वीज पडल्यानेच दोन्ही भावांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
