बोरीवली पूर्व येथे १८ सप्टेंबर रोजी झालेल्या कार अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झालेली इंडिगो एअरलाइन्सची केबिन क्रू सदस्य कैन्नूर मिस्त्री हिचे उपचारादरम्यान शनिवारी निधन झाले. ३२ वर्षीय कैन्नूरच्या पश्चात आठ वर्षांचा मुलगा आहे.
कस्तुरबा मार्ग पोलिसांनी कॅब चालक विजय खोसे (वय २५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१) (निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवून आणणे) अन्वये कारवाई केली असून चौकशीसाठी हजर राहण्याबाबत विजयला नोटीस बजावली आहे.
उड्डाणपुलाच्या कठड्यावर गाडी आदळली
मीरा रोड येथील रहिवासी असलेली कैन्नूर कामावरुन घरी जाण्याासाठी ‘मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर’ कारमधून प्रवास करत होती. कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी इंडिगोने ‘मयुरेश टूर अँड ट्रॅव्हल’ कंपनीकडून गाड्या भाडे तत्त्वावर घेतल्या होत्या. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चालक विजय खोसे याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती पुलाच्या कठड्यावर आदळली.
“सुरुवातीला आम्ही विजय खोसेवर सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि मानवी जीवनास किंवा वैयक्तिक सुरक्षिततेस धोका निर्माण करणारी कृती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. कैन्नूरच्या मृत्यूनंतर त्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१) (निष्काळजीपणामुळे मृत्यू) हे कलम जोडण्यात आले. त्याला नोटीस बजावण्यात आली आहे,” अशी माहिती कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिली.
हा अपघात पहाटे ५.४५ वाजता पश्चिम दृतगती महामार्गाच्या उत्तरेकडे जाणाऱ्या लेनवर ‘ब्लू स्काय को-ऑपरेटिव्ह सोसायटी’जवळ झाला, असे पोलिसांनी सांगितले.
पुलाच्या उंचवट्यावर नियंत्रण सुटलं, चालकाचा दावा
“पुलावरील एका उंचवट्यावरुन गाडी चालवण्याचा प्रयत्न करताना नियंत्रण सुटल्याचा दावा विजय खोसे याने केला. त्याला कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र कैन्नूर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटना घडली तेव्हा त्या गाडीच्या मागील सीटवर बसल्या होत्या” असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
मीरा रोडचाच रहिवासी असलेल्या विजय खोसे याने इतरांच्या मदतीने कैन्नूर यांना मीरा रोड येथील ‘भक्ती वेदांत रुग्णालयात’ नेले, तिथे शनिवारी संध्याकाळी उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, विजय मद्यधुंद अवस्तेथ नव्हता आणि तो घटनास्थळावरुन पळूनही गेला नाही. त्याला तो परिसर आणि तिथली रुग्णालये माहित होती. अपघातानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि नोटीस बजावण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, याच प्रकरणात दुसरी नोटीस जारी केली जाणार नाही.
प्रेमळ आई, निष्ठावान कर्मचारी
“पारसी झोरोस्ट्रियन्स वर्ल्डवाइड – द हैदराबादी पेज” द्वारे देण्यात आलेल्या ऑनलाइन श्रद्धांजलीमध्ये त्यांची ओळख ‘कैन्नूर अर्देशिर मिस्त्री’ अशी करून देण्यात आली असून, त्यांना एक प्रेमळ आई, सहृदयी मुलगी आणि निष्ठावान कर्मचारी म्हणून संबोधण्यात आले आहे. या पोस्टमध्ये एअरलाइन्सद्वारे वापरल्या जाणाऱ्या थर्ड-पार्टी कॅब पुरवठादारांच्या चालकांचे वर्तन, बेदरकार ड्रायव्हिंग, निकृष्ट दर्जाची वाहने, देखरेख आणि उत्तरदायित्वाबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली होती.
कैनूर सोशल मीडियाचा खूप वापर करत असे. ती एअर होस्टेस, नृत्यांगना आणि तिचा मुलगा कियानची आई म्हणून तिच्या आयुष्याबद्दलचे इंस्टाग्राम रील्स पोस्ट करत असे. ती अनेकदा ‘एक्स’वर ग्राहकांच्या तक्रारी पोस्ट करत असे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने तिच्या तीन मैत्रिणींना, ज्या डान्सर किंवा मॉडेल आहेत, फोन केला, पण त्यांना या अपघाताबद्दल काहीही माहिती नव्हती.
