सणासुदीच्या काळात तुमच्या पोटात विष जातंय? ६ लाखांचा संशयास्पद खवा अन् मिठाई जप्त; एफडीएची मोठी कारवाई

 राज्यभरात राबवल्या जात असलेल्या ‘Safe Food Safe Maharashtra’ या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने छत्रपती संभाजीनगरात मोठी कारवाई केली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरात विक्रीसाठी गुजरातहून ट्रॅव्हल्सने आणलेला तब्बल ३,६९१ किलोग्रॅम वजनाचा, सुमारे ६ लाख रुपये किमतीचा संशयास्पद मिठाई व खवासदृश अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी शाहनूरमियाँ दर्गा चौकातील डी-मार्टसमोरील ट्रॅव्हल्स पार्किंग परिसरात एफडीएच्या पथकाने छापे टाकून ही धडक कारवाई केली.

मुंबई एफडीएच्या आयबी विभागातील अधिकारी श्रीनिवास केदार यांना गुजरातहून ट्रॅव्हल्सद्वारे निकृष्ट दर्जाचा व भेसळयुक्त खवा तसेच मिठाई शहरात येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एफडीएच्या अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, श्रीमती कीर्तिका झाडे आणि योगेश चिभादे यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी शाहनूरमियाँ दर्गा चौकात दबा धरून दोन वेगवेगळ्या ट्रॅव्हल्सवर छापे टाकले.

– ​१. पहिली कारवाई (नीलकंठ ट्रॅव्हल्स – AR 01 AR 5135):

अहमदाबादहून आलेल्या नीलकंठ ट्रॅव्हल्सच्या बसमधून संशयास्पद माल उतरवला जात असताना एफडीएच्या पथकाने तपासणी केली. यामध्ये ‘राधे’ ब्रँडचे रिचेस्ट स्विट डिलाईट (कंडेन्स्ड मिल्क ॲनालॉग) आणि स्विट हलवा असा २०७९ किलोग्रॅमचा साठा जप्त करण्यात आला, ज्याची बाजारभावानुसार ३ लाख ५५ हजार ५०० रुपये किंमत आहे.

– ​२. दुसरी कारवाई (वीर ट्रॅव्हल्स – AR 02 C 7878):

त्याच ठिकाणी आलेल्या वीर ट्रॅव्हल्सच्या बसची झाडाझडती घेतली असता ‘नंदेश्वर’ ब्रँडचे प्रीमियम डेझर्ट व स्विट हलवा, ‘ब्रिजवासी’ ब्रँडचे रिच स्विट डिलाईट आणि ‘गोकुळ’ ब्रँडचे ट्रॅडिशनल स्विट्स असा १६१२ किलोग्रॅमचा साठा आढळून आला. हा २ लाख ४९ हजार २३६ रुपये किमतीचा साठा एफडीएने जागीच जप्त केला.

उणे १० अंश तापमानात माल सील; अहवालानंतर गुन्हे दाखल होणार…

अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे यांनी जप्त केलेल्या दोन्ही ठिकाणच्या मिठाई आणि खव्याचे कायदेशीर नमुने ताब्यात घेऊन ते विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. उर्वरित ३,६९१ किलोचा संपूर्ण साठा खराब होऊ नये म्हणून मराठवाडा कोल्ड स्टोरेज प्रा. लि. येथे उणे १० डिग्री सेल्सिअस (-10°C) तापमानात सुरक्षित सीलबंद करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *