कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने खून केला. त्यानंतर पतीने स्वतःवरही वार करून दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी मारली. देहूगाव येथील ओमकार सोसायटीमध्ये रविवारी पहाटे पावणेसहाला ही घटना घडली.
शुभांगी आकाश बारस्कर (वय २८, रा. ओमकार हाउसिंग सोसायटी, देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती आकाश रामदास बारस्कर (वय २६, व्यवसाय आयटी कंपनी, रा. ओमकार सोसायटी, देहूगाव) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे सहाच्या सुमारास गस्तीवरील पोलिसांना देहूगाव येथील ओमकार सोसायटी परिसरात एकाला मारहाण झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा घरमालक प्रकाश रामचंद्र राऊत यांच्याकडे भाड्याने राहणारा आकाश बारस्कर हा रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला आढळला. त्याची पत्नी शुभांगी ही दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी दोघांनाही तत्काळ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शुभांगीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तर, आकाशवर उपचार सुरू आहेत.
एक वर्षापासून दोघांमध्ये वाद
आकाश आणि शुभांगी यांचा डिसेंबर २०२३ मध्ये विवाह झाला होता. चार ते पाच महिन्यांपासून दोघेही ओमकार सोसायटीत भाड्याने राहत होते. प्राथमिक चौकशीत मागील सुमारे एक वर्षापासून दोघांमध्ये वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. याच वादातून आकाशने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर त्याने स्वतःवरही वार करून बचाव करण्याच्या उद्देशाने दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी मारल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.
