अडीच फुटाच्या जागेवरून दोन गटात कुऱ्हाड, कोयता, लोखंडी टोचा आणि लाकडी दांडक्यांने झालेल्या सशस्त्र हल्ल्यात एकाची हत्या झाली असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. गावची जत्रा अवघ्या आठ दिवसांवर असताना कराड तालुक्यातील हेळगावमध्ये रविवारी सकाळी ही थरारक घटना घडली आहे. तुंबळ हाणामारीत अनेक जण जखमी देखील झाले आहेत. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादींवरून दोन्ही गटातील दहा जणांवर मसूर पोलीस ठाण्यात खुनासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर हेळगावात तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कराड तालुक्यातील हेळगाव येथे रस्त्याच्या वाटेच्या वादातून रविवारी सकाळी दोन गटांत वाद झाला. कुऱ्हाड, कोयता, लोखंडी टोचा आणि लाकडी दांडक्यांनी झालेल्या केलेल्या हल्ल्यात सूरज भरत सूर्यवंशी (वय २८) याची हत्या झाली. तो विकास सोसायटीत सचिव होता. या हाणामारीत दोन्ही कुटुंबातील अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर हेळगावमधील वातावरण तणावपूर्ण असून गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
