आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये २२ वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य संपल्याच्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्यानंतर, या प्रकरणात आरोपी करण्यात आलेल्या प्राध्यापकासह संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी लवकरच पाचारण केले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त (डिटेक्शन) यांच्या नेतृत्वाखाली केला जाणार आहे.
साहिलचे हॉस्टेलमध्ये आयुष्य संपवलं
साहिल रवींद्र वाकोडे हा यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असून तो आयआयटी मुंबईच्या ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात बीटेकच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. शुक्रवारी सायंकाळी पवई कॅम्पसमधील होस्टेल क्रमांक चारमधील खोलीत छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळला.
परीक्षेत चॅटजीपीटी वापरल्याचा आरोप
मध्य सत्राच्या परीक्षेदरम्यान मोबाइल फोन आणि ‘चॅटजीपीटी’चा वापर केल्याचा आरोप त्याच्यावर होता. परीक्षेचा प्रश्नपत्रिकेचा मजकूर चॅटजीपीटीवर अपलोड करून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे आयआयटी मुंबईने म्हटले आहे. मात्र, या प्रकरणी त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नव्हती, असे संस्थेने स्पष्ट केले आहे.
परीक्षेतील प्रकारानंतर संबंधित प्राध्यापक आणि विभागप्रमुखांनी साहिलशी चर्चा करून त्याचे समुपदेशन केले होते. या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर विपरित परिणाम होणार नाही, असे त्याला आश्वस्त करण्यात आल्याचे आयआयटीकडून सांगण्यात आले. त्यानंतर तो होस्टेलमधील आपल्या खोलीत परतला आणि त्याच दिवशी सायंकाळी त्याचा मृतदेह आढळला.
