लंडनच्या गणेशोत्सवाला डोंबिवलीतून सजावटीची आरास ;घडविले अष्टविनायकांचे दर्शन

लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवातील यंदाची सजावट डोंबिवलीतील ‘गद्रे बंधूं’च्या चमूने साकारली आहे. मंडळाचे कार्यकर्ते जैलेश देशपांडे हे मूळचे डोंबिवलीकर आहेत. त्या ओळखीतून ही सजावट गद्रे बंधूंनी साकारली. जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात हे काम करायचे ठरले आणि रक्षाबंधनाच्या दिवशी सजावट लंडनसाठी रवानाही झाली. या सजावटीमध्ये महाराष्ट्रातील अष्टविनायकांचा देखावा साकारण्यात आला असून, त्यासाठी पूर्णपणे पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर करण्यात आल्याचे मयुरेश गद्रे यांनी सांगितले.

कागदाच्या साहाय्याने सजावट

श्रींच्या मूर्तीमागे मुख्य गाभारा आणि दोन्ही बाजूंना प्रत्येकी चार पॅनेल्सवरअष्टविनायक अशी या सजावटीची रचना आहे. दीड फूट रुंद आणि साडेचार फूट लांब अशा लाकडी चौकटीवर प्रत्येक पॅनेल उभे करण्यात आले आहे. या आठ पॅनेल्सवर पुठ्ठा आणि हँडमेड कागदाच्या साहाय्याने सजावट करण्यात आली आहे.

तीन आठवड्यांत ही सजावट साकारली

गाभाऱ्यावरील नगारखाना सजवताना त्यात कापडी पडद्यांचा वापर करण्यात आला. ॲड. हरीश चव्हाण, भगवान भंडारी, रोहन ढवळे, सुलेखनकार उमेश पांचाळ यांच्या सहकार्याने मयुरेश आणि स्मिता गद्रे यांनी तीन आठवड्यांत ही सजावट साकारली.

ऑनलाईन यादी

२५ ऑगस्टला सजावटीचे सर्व सुटे भाग लहान-मोठ्या २१ बॉक्समध्ये पॅक करण्यात आले. कुठल्या बॉक्समध्ये काय आहे, याची यादी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठवली. चार दिवसांत हे सामान सुखरूप लंडनला पोहोचले.

जैलेश देशपांडे यांची संकल्पना

त्यानंतर फोन, व्हिडिओ कॉलद्वारे एकमेकांशी संपर्क साधत सजावट प्रत्यक्ष उत्सवाच्या ठिकाणी साकारण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष वृषाल खांडके, माजी अध्यक्ष सुधाकर खुरजेकर आणि कार्यकर्ते जैलेश देशपांडे यांच्या संकल्पनेतून हीसजावट तयार करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *