गणेशोत्सवादरम्यान अनेक मूर्ती चर्चेचा विषय ठरत असतात. अशीच हैदराबादच्या बेगम बाजारमधील ‘फीलखाना’ येथील एक मूर्ती भाविकांचं लक्ष वेधून घेत असून, तिला पाहण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र हैदराबादच्या गोशामहल पोलिसांनी ‘ली ची का राजा गणेश 2026’ (Lee Chee Ka Raja Ganesh 2026) या मोठ्या प्रमाणावर गाजलेल्या मूर्तीबाबत सत्य समोर आणलं आहे.
सोशल मीडियावरील पोस्ट्समुळे ही मूर्ती चर्चेत आली होती. या पोस्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, ही 48 किलो वजनाची ‘पंचलोह’ गणेशमूर्ती असून तिला 24-कॅरेट सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे आणि ती 3 लाख 83 हजार 800 अमेरिकन हिऱ्यांनी सजवण्यात आली आहे. ‘गोल्डन गणेश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मूर्तीची निर्मिती मुंबईचा ‘लालबागचा राजा’ आणि ‘तिरुपती बालाजी’ यांच्यापासून प्रेरणा घेऊन, तसेच भाविकांसाठी एक विशेष अर्पण म्हणून कुशल कारागिरांकडून करण्यात आल्याचे सांगितले जात होते.
