रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जगप्रसिद्ध घारापुरी बेट प्राचीन काळी केवळ धार्मिक केंद्र होते की ते महत्त्वाचे सागरी व्यापारकेंद्रही होते, याचा शोध घेण्यासाठी महत्त्वाकांक्षी संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
उलगडणार इतिहास
आयआयटी खरगपूर, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) आणि मुंबई पोर्ट अथॉरिटी (एमबीपीए) यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे घारापुरी बेटाच्या पोटात आणखी कोणती रहस्ये लपली आहेत, याचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
समुद्रतळातील बदलांचा अभ्यास
एमबीपीएच्या अर्थसाहाय्याने राबविण्यात येणाऱ्या या सुमारे एक कोटी रुपयांच्या प्रकल्पात घारापुरी तसेच पश्चिम किनारपट्टीवरील प्राचीन सागरी व्यापार, मानवी वस्ती, हवामान आणि समुद्रपातळीतील बदलांचा अभ्यास केला जाणार आहे. यात सुमारे १,४०० वर्षांपूर्वीच्या प्राचीन ते मध्ययुगीन कालखंडावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
उत्खननात सापडल्या या गोष्टी
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणविभागाचे अधीक्षक पुरातत्त्वज्ञ डॉ. अभिजित आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत झालेल्या उत्खननात मोराबंदर परिसरात विविध महत्त्वपूर्ण अवशेष आढळले आहेत. यामध्ये मोठी साठवण भांडी, इंडो-मेडिटेरेनियन व रोमन अँफोरांचे तुकडे, फिरोजी रंगाची चकाकणारी भांडी, तसेच मेसोपोटेमियन टॉर्पेडो आकाराच्या भांड्यांचा समावेश आहे.
संशोधकांचे मत
या वस्तू दूरवरच्या प्रदेशांशी असलेले व्यापारसंबंध अधोरेखित करतात. तसेच, उत्खननात सुमारे १६५ चौरस मीटर क्षेत्रफळाची आणि आठ मीटर खोल आयताकृती जलसाठवण रचना आढळली आहे. पायऱ्यांची रचना असलेला हा जलसाठा तत्कालीन मानवी वस्ती आणि व्यापारव्यवस्थेबाबत महत्त्वाचे संकेत देत असल्याचे संशोधकांचे मत आहे.
महत्त्वाचा अध्याय समोर येणार
प्राचीन काळी घारापुरी बेटाभोवती समुद्राची पातळी सध्यापेक्षा अधिक होती का आणि त्यामुळे मोठ्या जहाजांना बेटाजवळ नांगर टाकणे शक्य होते का, याचाही शोध संशोधक घेणार आहेत. घारापुरी बेटाच्या परिसरात सापडलेल्या जलचिन्हांसह अन्य पुराव्यांवरून हे बेट केवळ धार्मिक स्थळ नसून व्यापक सागरी वाहतूक व्यवस्थेचा भाग असण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. या संशोधनातून घारापुरी बेटाच्या प्राचीन इतिहासासोबतच पश्चिम किनारपट्टीवरील सागरी व्यापाराचा एक महत्त्वाचा अध्याय नव्याने समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विविध भागांतून गाळाचे नमुने घेतले जाणार
या प्रकल्पांतर्गत घारापुरीसह पश्चिम किनारपट्टीवरील विविध भागांतून गाळाचे नमुने घेतले जाणार आहेत. त्यावर रेडिओकार्बन डेटिंग, ऑक्सिजन , कार्बन आणि नायट्रोजन समस्थानिकांचे विश्लेषण केले जाणार आहे. यामुळे प्राचीन काळातील हवामान, समुद्रपातळी आणि गाळाच्या उगमस्थानाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. समुद्रपातळीतील बदलांचाही या अभ्यासात विशेष विचार केला जाणार आहे.
संशोधकांचा अभ्यास महत्त्वाचा
आंतरसरकारी हवामान बदल समितीच्या अंदाजानुसार २१००पर्यंत जागतिक समुद्रपातळी सुमारे ०.४ ते ०.८ मीटरने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीवरील सखल भागांवर भविष्यात होणारे परिणाम समजून घेण्यासाठी संशोधकांकडून केला जाणारा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला
