पुणे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला पुन्हा एकदा खतपाणी घालणारी आणि हादरवून टाकणारी आणखी एक घटना समोर आली आहे. शिरूर शहराच्या मध्यवर्ती भागात जुन्या वैमनस्यातून एका ३३ वर्षीय तरुणाची भररस्त्यात गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. हरीश गंगावणे असे मृत तरुणाचे नाव असून, लाटेआळी भागातील आंबेडकर नगर परिसरात शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हा थरार घडला. ऐन गर्दीच्या वेळी आणि सणासुदीच्या दिवसांत घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे सावट पसरले आहे.
आरोपी अन् गंगणावणेमध्ये बारमध्ये वाद
हरीश गंगावणे हा शिरूरमध्ये बिअर बार चालवत होता. सुमारे सहा महिन्यांपूर्वी संशयित आरोपी असलेले रोहित सोनावणे आणि अनिकेत गव्हाणे त्याच्या बारमध्ये गेले होते. तेथे दारूच्या बिलावरून हरीश आणि आरोपींमध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यावेळी गंगावणे याने रोहित आणि अनिकेतला मारहाण केली होती. मारहाणीत आरोपींचा मोठा अपमान झाला होता. तेव्हापासून आरोपी हरीशवर खार खाऊन होते आणि संधी मिळताच त्याचा काटा काढण्याच्या तयारीत फिरत होते.
