IIT मुंबईमध्ये विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, परीक्षेत ChatGPT चा वापर करताना रंगेहात पकडला गेला म्हणून…

आयआयटी मुंबईच्या ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाच्या दुसऱ्या वर्षाच्या एका विद्यार्थ्याने शुक्रवारी संध्याकाळी आपलं आयुष्य संपवलं. या घटनेपूर्वी परीक्षेदरम्यान हा विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये मोबाईल फोनमध्ये ChatGPT चा वापर करताना आढळला होता. उत्तरे मिळवण्यासाठी त्याने परीक्षेची प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर अपलोड केली होती. त्यानंतर संस्थेने त्याला परीक्षा देण्यापासून रोखलं पण या घटनेनंतर विद्यार्थ्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई केली नव्हती. त्याच्यावर कारवाई करण्यापेक्षा याउलट प्रशिक्षक आणि विभागप्रमुखांनी त्याच्याशी या संदर्भात संवाद साधला. त्याचे समुपदेशनही केल्याचे सांगण्यात येत आहे. तिला सांगण्यात आलं की, या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.

या घटनेनंतर विद्यार्थी वसतिगृहात गेला आणि त्यानंतर खोलीत त्याचा संध्याकाळी मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे कॅम्पसमधील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र  दुःख व्यक्त करण्यात येत असून त्यांच्यामध्ये नाराजीचे सूर आहे. गेल्या सात महिन्यात तीन विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. त्यामुळे कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थी धरणे आंदोलनावर बसले आहेत. प्रशासन सत्य लपवत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तर विद्यार्थ्यांचे दावे प्रशासनाने फेटाळून लावले आहेत. विद्यार्थ्यांनी दावा केला आहे की, कॉपी केल्याबद्दल विद्यार्थ्याला निलंबित करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यावर मानसिक दबाव होता आणि आपले भविष्य उद्ध्वस्त होण्याच्या भीतीने त्याने टोकाचे पाऊल उचलले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *