पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कोहाट येथे पोलीस लाइन्सजवळ एक भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 16 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा स्फोट शुक्रवारच्या नमाजदरम्यान झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की मशिदीबाहेर एक मोठा खड्डा पडला. तसंच मशिदीच्या बाहेरील भागाचे मोठे नुकसान झाले आणि एक भिंतही कोसळली.
खैबर पख्तुनख्वाचे आयजी (IG) झुल्फिकार हमीद यांनी ‘जिओ न्यूज’ला सांगितले की, स्फोटकांनी भरलेले एक वाहन जुन्या ‘पोलीस लाइन्स’च्या गेटवर धडकले. या धडकेनंतर भीषण स्फोट झाला आणि त्यासोबतच गोळीबारही झाला. डीएचक्यू (DHQ) रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक (MS) डॉ. ताहिर अली शाह यांनी सांगितले की, रुग्णालयात 15 मृतदेह आणि 50 हून अधिक जखमींना आणण्यात आले आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे.
शहबाज शरीफ यांच्याकडून हल्ल्याचा निषेध
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी कोहाट पोलीस लाइन्समध्ये झालेल्या स्फोटाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या घटनेत अनेकाचां मृत्यू झाल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. पंतप्रधानांनी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आणि पीडितांना त्वरित व सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. शहबाज यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून स्फोटाचे स्वरूप आणि कारण यांबाबतचा अहवालही मागवला आहे. त्यांनी मदत आणि बचाव कार्य जलद गतीने करण्याच्या तसेच बाधित लोकांना सर्वतोपरी मदत पुरवण्याच्या सूचना दिल्या.
पाकिस्तानमधील यापूर्वीचे स्फोट
पाकिस्तानमध्ये मशिदी आणि प्रार्थनास्थळांना लक्ष्य करून घडवून आणल्या जाणाऱ्या स्फोटांची मालिका नवीन नाही. अलीकडच्या काळात, प्रार्थनेदरम्यान अनेक मशिदींना लक्ष्य करण्यात आले आहे, ज्यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आणि शेकडो लोक जखमी झाले. पेशावरपासून इस्लामाबाद आणि पाराचिनारपर्यंतच्या विविध ठिकाणी झालेले हे हल्ले सुरक्षेच्या परिस्थितीबाबत गंभीर प्रश्न निर्माण करतात. कोहाटमधील अलीकडील स्फोटानंतर, पाकिस्तानमधील मशिदींवरील मोठ्या हल्ल्यांची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. अशा काही प्रमुख घटनांची यादी खाली दिली आहे.
