१९ सप्टेंबरनंतर अधिक तीव्र होण्याचा अंदाज
उत्तर अंदमान समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र १९ सप्टेंबरनंतर अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. मॉडेलनुसार केलेल्या विश्लेषणाच्या आधारे महाराष्ट्रात रविवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून तो बुधवार किंवा गुरुवारपर्यंत कायम राहू शकतो, अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे माजी प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. घाट क्षेत्रात या काळात मुसळधार पाऊस पडू शकेल, तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र या पावसामुळे तूट मोठ्या प्रमाणात भरून निघण्याची आशा नसल्याचेही ते म्हणाले.
घगर्जनेसह हलक्या ते मध्यम सरींची उपस्थितीप्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २२ सप्टेंबरपर्यंत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम सरींची उपस्थिती असू शकते, तर पालघर जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात. ठाणे जिल्ह्यात २१ सप्टेंबरला मेघगर्जनेसह ताशी ४० किलोमीटरपर्यंत वेगाने वारे वाहू शकतात. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत शनिवारपासून मेघगर्जना, विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकेल, तसेच ताशी ४० किमीपर्यंतच्या वेगाने वारे वाहू शकतील. त्यामुळे या जिल्ह्यांना ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला असून विदर्भाला मात्र सध्या तरी कोणताही इशारा नाही.
संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष
एकंदरीत, राज्याच्या हवामानात पुन्हा एकदा बदल झाला असून कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तर विदर्भात तुलनेने कोरडे आणि उष्ण-दमट हवामान राहू शकते. त्यामुळे आता राज्यात पुन्हा किती आणि कुठे पाऊस होतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
