: ज्या घरादारांत आणि गल्लीबोळांत बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, जिथे ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘मोरया’च्या जयघोषात लाडक्या गणरायाचे स्वागत करण्याची तयारी पूर्ण झाली होती, तिथेच एका क्षणात शांतता पसरली. गणेशमूर्ती आणण्यासाठी रात्रीच्या अंधारात निघालेला २३ वर्षीय कृष्णा ज्ञानेश्वर बेरड याचा अपघाती मृत्यू झाल्याने वडनेर दुमाला परिसरावर शोककळा पसरली आहे. उत्सवाच्या आनंदात रंगलेले वातावरण क्षणात दुःखात बदलले आहे.
नेमकी घटना काय?
वडनेर येथील ‘मोरया फाउंडेशन’च्या माध्यमातून गावातील तरुण यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याच्या तयारीत होते. बाप्पाचे आगमन दिमाखात व्हावे, यासाठी कृष्णा आणि त्याचे मित्र गेल्या काही दिवसांपासून अथक मेहनत घेत होते. सोमवारी (दि. १४) रात्री उशिरा पाथर्डी फाट्यावरील काम आटोपून कृष्णा मित्रासह आडगाव नाक्याकडे गणेशमूर्ती आणण्यासाठी निघाला होता. मात्र, छत्रपती संभाजी नाका परिसरातील उड्डाणपुलाजवळ त्याच्या दुचाकीचा अपघात झाला.
मित्रपरिवाराला जबर धक्का
अपघातात कृष्णा रस्त्यावर फेकला गेला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्याला तातडीने उपचारांसाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पहाटेच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी निघालेल्या कृष्णाच्या अशा अकस्मात मृत्यूने त्याच्या मित्रपरिवाराला जबर धक्का बसला आहे. ज्या हातांनी लाडक्या विघ्नहर्त्याची मूर्ती आणायची होती, तेच हात काळाने कायमचे हिरावून घेतल्याची भावना व्यक्त होत आहे.
जिवाभावाचा मित्र गेल्यानं हळहळ
जिवाभावाचा मित्र गमावल्याने ‘मोरया फाउंडेशन’ने यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आनंदोत्सवाऐवजी कृष्णाच्या आठवणी आणि त्याच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला. कृष्णाच्या आई-वडील, बहीण आणि नातेवाइकांचा आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. बाप्पाच्या आगमनाने उजळून निघणाऱ्या गावात आता आनंदाऐवजी स्तब्धता, अश्रू आणि हळहळ उरली आहे.
पोटच्या गोळ्यानं माऊलीला संपवलं
नशेच्या धुंदीत पत्नीशी किरकोळ कारणावरून भांडण करणाऱ्या मुलाने मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या वृद्ध आईच्या डोक्यात टणक वस्तूने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘जेवणात पिठलं का नाही बनवलं’ या कारणावरून हा वाद सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. हनुमान नगरात घडलेल्या खुनाच्या घटनेत संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, गंगापूर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
