नागपूरच्या गोरेवाडा परिसरातील दिनशॉ फॅक्टरीजवळ मंगळवारी रात्री भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या महिला चालकाने अक्षरशः थरार माजवला. महिलेचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारची एका एसयूव्हीला धडक बसली. त्यानंतर रस्त्यावरील तीन चिमुकल्यांसह एकूण सुमारे सात जण कारच्या धडकेत जखमी झाले. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींमध्ये दोन नागरिकांसह तीन लहान मुले आणि बालू कुलमेथे व त्यांच्या मुलीचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, महिला चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून, वैद्यकीय तपासणीसह पुढील चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महिला चालक कार भरधाव वेगाने चालवत होती. तिचे कारवरील नियंत्रण सुटल्याने सर्वप्रथम बालू कुलमेथे यांच्या एसयूव्हीला जोरदार धडक बसली. त्यावेळी बालू हे आपल्या मुलीसह कारमधून खाली उतरत होते. अचानक झालेल्या धडकेमुळे परिसरात मोठा आवाज झाला आणि काही क्षणांतच घटनास्थळी गोंधळ उडाला. एसयूव्हीला धडक दिल्यानंतरही महिला चालकाने कारवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र कारचा वेग अधिक असल्याने कार पुढे जाऊन रस्त्यावरील नागरिकांना धडकली. या धडकेत तीन चिमुकली मुलेही जखमी झाली. तसेच या मार्गावरून जाणारे हरीश रामभाऊ रेवतकर (४०, रा. गोधनी) आणि आशीष नखाते (३२, रा. नारा) यांनाही कारने धडक दिली. दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. काही क्षणांतच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच गुट्टीखदान पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अपघातानंतर संतप्त नागरिक मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात पोहोचले. जमावाने पोलिस ठाण्याचा घेराव करत महिला चालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली. भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. तीन चिमुकली मुले या अपघातात जखमी झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते.
दरम्यान, महिला चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. मात्र, ती प्रत्यक्षात नशेत होती की नाही, हे वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी महिला चालकाला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू केली आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासणार
अपघात नेमका कसा घडला, महिला चालकाचा कारवरील ताबा कशामुळे सुटला, वाहनाचा वेग किती होता आणि अपघातावेळी कारमध्ये कोण कोण होते, याचा तपास पोलिस करीत आहेत. घटनास्थळाच्या आसपास असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांकडून तपासण्यात येत आहे. या घटनेत जखमी झालेल्या सात जणांमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. पोलिसांकडून उपलब्ध पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.
