अकोल्याचे भाजप खासदार अनूप धोत्रे (Anup Dhotre) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने (Nagpur. Bench) 25 हजार रुपयांचा दंड ठोठावलाय. निवडणूक याचिकेतील लेखी उत्तर दाखल करण्यास झालेल्या विलंबामुळे न्यायालयाने (High Court) ही कारवाई केलीय. दोन आठवड्यांत दंडाची रक्कम गोंदिया जिल्हा वकील संघटनेच्या खात्यात जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून देण्यात आलेयेत.
अकोल्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असलेल्या गोपाल चव्हाण यांनी अकोला लोकसभा निवडणुकीच्या निकालाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिलेय. गोपाल चव्हाण हे बार्शीटाकळी तालुक्यातील उमरदरी येथील रहिवाशी आहेत. दिवाणी प्रक्रिया संहितेच्या आदेश 8, नियम 1 नुसार धोत्रेंना 90 दिवसांत लेखी उत्तर दाखल करणे आवश्यक होते. मात्र, विलंब झाल्याने चव्हाण यांनी धोत्रेंच्या उत्तराशिवाय पुढील कार्यवाहीची मागणी केलीय. खासदार धोत्रेंनी मात्र नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार आणि प्रकरणाच्या गुणवत्तेवर निर्णयासाठी आपले उत्तर रेकॉर्डवर घेण्याची मागणी केलीय. यावर न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांनी 25 हजारांचा दंड ठोठावला. पुढील सुनावणी 8 सप्टेंबरला होणारेय.
दरम्यान, याचिकेमुळे सुरक्षित ठेवलेल्या अकोला लोकसभा निवडणुकीतील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन इतर निवडणुकांसाठी वापरण्यासाठी मुक्त करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिलेय. मतमोजणी किंवा ईव्हीएमबाबत कोणताही वाद नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केलेय.
निवडणूक खर्चाची मर्यादा 95 लाख रुपये असताना धोत्रेंनी 81 लाख 17 हजार 102, तर भाजपने 6 लाख 55 हजार 830 रुपये खर्च दाखवला. म्हणजे एकूण 87 लाख 72 हजार 932 रुपये. मात्र, भाजपने धोत्रेंच्या प्रचारासाठी 1 कोटी 24 लाख 60 हजार 590 रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याचा चव्हाण यांचा दावा आहे. त्यामुळे धोत्रेंची निवड रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अकोल्यातून भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या डॉ. अभय पाटील यांचा पराभव केलाय. शिवाय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील पराभूत झाले आहेत. चाळीशीतील अनुप धोत्रे ठरलेत जायंट किलर ठरले आहेत. त्यांनी पहिल्याच निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांसह काँग्रेस उमेदवाराचा दारूण पराभव केला. अनुप धोत्रे यांचे वडील संजय धोत्रे याआधी सलग चार वेळेस खासदार झाले होते. संजय धोत्रे आजारी असल्याने अनुप धोत्रेंना भाजपनं मैदानात उतरवलं होतं. त्यात त्यांनी एकहाती यश खेचून आणले आहे.
