एसटी बसचा दरवाजा अचानक निखळून खाली पडला, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर Video Viral

एसटी बस ही महाराष्ट्रातील रस्ते प्रवासाची जीवनवाहिनी मानली जाते. शहरांपासून ते गावागावांपर्यंत दररोज हजारो प्रवासी एसटी बसमधून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत असतात. मात्र याच एसटी बसेसची झालेली दुर्दशा पुन्हा एकदा समोर आली आहे. सध्या मोखाडा बसस्थानकात जव्हार आगाराच्या एसटी बसचा व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये एसटी बसचा दरवाजा अचानक निखळून खाली पडल्याची घटना घडली. एसटीचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी कसा बसा तुटलेला दरवाजा सावरण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने बस आगारात उभी होती त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शहरीभागात अधिकतर नवीन खरेदी केलेल्या एसटी बस चालवल्या जातात. मात्र गावोगावी प्रवासासाठी अनेकदा आगारातील जुन्या बस दिल्या जातात. मात्र जुन्या जीर्ण झालेल्या बसमधून अनेकदा पावसाचे पाणी गळते तर तर अनेकदा त्यांचे सीट, दार खिडक्या इत्यादीं खराब अवस्थेत असतात. मोखाडा बसस्थानकात जव्हार आगाराच्या एसटी बसचा दरवाजा अचानक निखळून खाली पडल्याची घटना घडल्यावर आता ग्रामीण भागात जुन्या आणि जीर्ण एसटी बसऐवजी नवीन बस देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

वारंवार बंद पडणाऱ्या बस, तुटलेल्या खिडक्या आणि आता थेट निखळून पडणारे दरवाजे यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने बसची नियमित तपासणी करून ग्रामीण भागात नवीन बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे. मोखाडा बसस्थानकात जव्हार आगाराच्या एसटी बसचा दरवाजा अचानक निखळून खाली पडल्याच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *