इट्स डन सिस! वांद्य्रातील कॅफेत तुकाराम मुंढेंना पाठवेन, सलमान खानची मैत्रिणीला प्रेमळ तंबी

अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नामांकित रेस्टॉरंट्स, आलिशान क्लब्स आणि लोकप्रिय फास्ट-फूड सेंटरवर धडक कारवाया सुरु केल्यापासून राज्यात ‘तुकाराम मुंढे इफेक्ट’ दिसून येत आहे. या रिअल लाईफ ‘सिंघम’मुळे राज्यातील खाद्यसंस्कृतीत स्पष्ट बदल घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या या आयएएस अधिकाऱ्याची दखल खुद्द बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान यानेही घेतल्याचे दिसून येते. नुकतेच सलमानने वांद्रे येथील आपल्या मैत्रिणीच्या नवीन कॅफेचे कौतुक केले, पण त्याच वेळी स्वच्छतेचे निकष पाळले नाहीत तर एफडीए प्रमुखांना तिथे पाठवण्याची अप्रत्यक्षपणे मिश्किल तंबीही दिली. त्याची ही इन्स्टा स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

मैत्रिणीच्या कॅफेचं कौतुक

मित्रांसाठी नेहमीच मदतीचा हात देणाऱ्या सलमान खानने नुकतंच मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या मैत्रिणीच्या नवीन कॅफेला सपोर्ट केला आहे. कॅफेच्या मालकिणीने शेअर केलेला व्हिडिओ पुन्हा शेअर करुन तिच्या उपाहारगृहाची त्याने जोरदार प्रसिद्धी केली. मात्र त्याने लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

इट्स डन, सिस

कोणाचेही थेट नाव न घेता, सलमानने गंमतीने धमकी दिली की, जर कॅफेने स्वच्छतेचे योग्य निकष पाळले नाहीत तर तो एफडीए आयुक्तांना तिथे पाठवेल. सलमानच्या खास शैलीतील विनोदाचा भाग म्हणजे या पोस्टमध्ये त्याच्या ‘इट्स डन, ब्रो’ या व्हायरल मीमचा हटके समावेश पाहायला मिळाला. यामुळे ही पोस्ट अधिकच मनोरंजक ठरली आहे.

सलमानची स्टोरी काय?

सलमानच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधील मजकुरात तो म्हणतो “सृष्टी, माझी कॉफी पुन्हा भरुन दे ना, प्लीज. किंमत वाढवू नको, गुणवत्ता टिकवून ठेव. स्वच्छता पाळा, नाहीतर मी ‘त्यांना’ (तुकाराम मुंढे यांना) पाठवेन आणि मग ‘इट्स डन, सिस’ (काम तमाम होईल).”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *