अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भंडारा, महाप्रसाद, इफ्तार पार्टी, लंगर अशा सार्वजनिक जेवणांच्या कार्यक्रमांसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे सार्वजनिक जेवणाचं आयोजन करताना सात दिवस आधी परवानगी घ्यावी लागले असं तुकाराम मुंढे यांनी जाहीर केलं आहे. तसंच जेवणाबाबात कॅटरर्स चालकाला संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. कच्चा माल कुठून घेतला याची माहिती देणंही बंधनकारक असणार आहे.
महाप्रसाद, इफ्तार पार्टी, अन्नछत्र, भंडारा, लंगर…
“महाप्रसाद, इफ्तार पार्टी, अन्नछत्र, भंडारा, लंगर यासंदर्भात आम्ही फॉरमॅट तयार केला आहे. कार्यक्रम होण्याच्या 7 दिवस आधी त्यांना तेथील संबंधित अधिकाऱ्याला माहिती द्यावी लागणार आहे. यानंतर अधिकारी तिथे जाऊन पाहणी करतील ही त्यामागील भूमिका आहे,” असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे.
ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्न बनवत आहात आणि ते विकत किंवा एखाद्याला खाण्यास देत आहात, तिथे त्यांच्यावर बंधनं न टाकता सुरक्षित अन्न देण्याचा प्रयत्न आहे असं त्यांनी निर्णयामागील कारण सांगितलं आहे.
तीन टप्प्यांमध्ये वर्गीकरण
“भारतामध्ये सणा समारंभाचे प्रमाण जास्त आहे, यामुळे या कालावधीत भेसळचे प्रमाणसुद्धा वाढू शकते. याचे परिणाम ग्राहकांवर होत असतात. फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ॲक्टनुसार जे हाय रिस्क फूड आहेत अशा गोष्टींवर आपण विशेष निर्बंध लावू शकतो. स्टॅंडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल असे सर्व सणांसाठी वर्षभरासाठी स्थायी आदेश राहतील. वेगळा आदेश काढण्याची इथून पुढे आवश्यकता राहणार नाही. वर्गीकरण तीन टप्प्यांमध्ये केले आहे. राज्यव्यापी एक स्तर असेल, दुसरा प्रादेशिक आणि तिसरा स्थानिक असेल. हे सर्व करत असताना चार टप्प्यांमध्ये कारवाई केली जाईल. सणाच्या 21 दिवस पूर्वी चालू होईल आणि सण संपल्यानंतरच तीस दिवसांसाठी राहील,” असंही त्यांनी सांगितलं आहे.
14 दिवसानंतर खटला दाखल होणार
“महाप्रसाद किंवा भंडारा या ठिकाणी सुद्धा जाऊन तपासणी केली जाईल. गैरप्रकार झाल्यास संबंधित सणानंतर 14 दिवसानंतर खटला दाखल करायचा असेल तर खटला दाखल केला जाईल.. झिरो टॉलरन्स आम्ही फॉलो करत आहोत,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
ख्रिसमस ईद दिवाळी अशा सगळ्या सणांवर असणार लक्ष
पुढे ते म्हणाले की, “मिठाई, खवा, पनीर, तूप, सुकामेवा, मटण, चिकन अशा अन्नपदार्थांची मागणी अनेक पटीने वाढते. याचा परिणाम म्हणजे भेसळ होणे किंवा असुरक्षित प्रॉडक्टमध्ये होतो. या पार्श्वभूमीवर वर्षभरासाठी पूर्ण कॅलेंडर तयार केले आहे. हा सर्व सण यात्रा उरूस यासाठी असेल, सर्व धर्मीयांसाठी असेल. ख्रिसमस ईद दिवाळी अशा सगळ्या सणांसाठी असेल. धर्मनिरपेक्ष असा असेल. कोणत्या सणात कोणते प्रॉडक्ट खाल्ले जातात किंवा विकले जातात त्यानुसार हाय रिस्क ठरवले जाईल.
चार टप्प्यात कारवाई होणार
“गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, ख्रिसमस आणि नववर्ष पूर्वसंध्या ही प्रथम कॅटेगरी असेल. मकरसंक्रांत, महाशिवरात्र, होळी, गुढीपाडवा, आषाढी व कार्तिक वारी, श्रावण मास, जन्माष्टमी दहीहंडी, कोजागिरी पौर्णिमा व गुरुनानक जयंती हे वर्ग दोन मध्ये असेल. जत्रा, पालखी सोहळे, उरुस असे सण असतील तर ते लोकल लेव्हलचे असतील अशी कॅटेगरी आहे. चार टप्प्यात याची कारवाई होणार आहे,” असंही ते म्हणाले आहेत.
रमजान व ईदच्या कालावधीत सुद्धा तपासणी केली जाईल. फळ पिकवण्याच्या बाबतीत अक्षय तृतीया दरम्यान तपासणी केली जाईल. ख्रिसमसच्या काळात बेकरी पदार्थांवर लक्ष असेल. बर्फ व पॅक बंद पाण्याची तपासणी केली जाईल असं ते म्हणाले आहेत.
