हडपसर ते घोरपडी कोच मेंटनन्स कॉम्प्लेक्स (जीसीएमसी) दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी पुणे आणि हडपसर यार्डमध्ये प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान टप्प्याटप्प्याने ब्लॉक घेण्यात येणार असून, त्याचा परिणाम पुणे विभागातून धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस, डेमू आणि लोकल गाड्यांवर होणार आहे. मात्र, ब्लॉकचा काही कालावधी गणेशोत्सवात येणार असल्यामुळे प्रवाशांना त्याचा त्रास होणार आहे.
रेल्वेच्या नियोजनानुसार १९ ते २३ सप्टेंबरदरम्यान दररोज दुपारी १२ ते सायंकाळी पाच या वेळेत पुणे-हडपसर मार्गावरील अप आणि डाउन मुख्य मार्गावर ब्लॉक असेल. त्यानंतर २४ सप्टेंबरपासून ब्लॉकचा कालावधी टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार आहे.
तीन ऑक्टोबरला हडपसर यार्डमध्ये सकाळी आठ ते दुपारी १२ आणि दुपारी १२ ते चार या वेळेत वाहतूक ब्लॉक असेल. चार ऑक्टोबरला मुख्य कामाचा दिवस असून, हडपसर–जीसीएमसी विभागात मध्यरात्रीपासून सकाळी साडेदहापर्यंत वाहतूक ब्लॉक सुरू राहणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत सिग्नल व दूरसंचार यंत्रणेशी संबंधित कामांसाठी ब्लॉक घेण्यात येईल. या कामामुळे एकूण ४२ मेल-एक्स्प्रेस आणि प्रवासी गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यातून एकूण ९८ फेऱ्यांवर परिणाम होणार आहे; तसेच २५ गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार असून, त्यांचा ३६ फेऱ्यांवर परिणाम होईल. ३५ गाड्या त्यांच्या नियोजित स्थानकाऐवजी अन्य स्थानकांवर अल्प समाप्त किंवा अल्प प्रारंभ करण्यात येणार आहेत. या गाड्यांच्या ९९ फेऱ्या प्रभावित होतील.
याशिवाय २२ गाड्यांच्या ७१ फेऱ्यांचे नियमन, तर १४ गाड्यांच्या २५ फेऱ्यांचे वेळापत्रक बदलण्यात येणार आहे. पुणे-सोलापूर, पुणे-नागपूर, पुणे-मुंबई, पुणे-हावडा या एक्स्प्रेस गाड्यांस विविध मार्गांवरील गाड्यांवर याचा परिणाम होणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांना गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, रद्दीकरण आणि मार्ग बदलाची माहिती तपासून प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे. तिसऱ्या मार्गिकेच्या कामामुळे भविष्यात पुणे विभागातील रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
