२१ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे घडली. प्लॉट खरेदीसाठी एक लाख रुपयांची मागणी करत सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृत्यूसमयी ती पाच महिन्यांची गर्भवती होती.
इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली समाधान चंदनशिवे (वय २१, रा. वडापुरी, ता. इंदापूर, मूळ रा. कन्हेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. सोनालीचा विवाह २३ नोव्हेंबर २०२५ रोजी समाधान उर्फ कार्तिक गौतम चंदनशिवे याच्याशी झाला होता.
प्लॉट खरेदीसाठी पैसे आणण्याचा तगादा
सोनालीचे वडील हनुमंत श्रीपती बनसोडे यांनी इंदापूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, विवाहानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींकडून प्लॉट घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावेत, अशी मागणी करण्यात येत होती. पैसे आणले नाहीत म्हणून सोनालीला शिवीगाळ, मारहाण तसेच उपाशी ठेवून त्रास दिला जात असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
वडिलांना त्रासाविषयी सांगितलेलं
माहेरी आल्यानंतर सोनालीने तिच्यावर होत असलेल्या त्रासाची माहिती वडिलांना दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, ३ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारास सोनालीने वडापुरी येथील राहत्या घरात गळफास घेतल्याची माहिती तिच्या सासरच्या मंडळींकडून कुटुंबीयांना फोनवरून देण्यात आली. ही माहिती मिळताच तिच्या वडिलांनी तातडीने इंदापूर गाठले. सोनालीला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
